जुन्नर : जुन्नरमध्ये सध्या बुलेटचे हळू आवाज करणारे सायलन्सर काढून मोठा आवाज काढणारे सायलन्सर बसवून त्याचा कर्कश आवाज करीत वेगाने बुलेट चालविण्याचे प्रकार वाढत आहेत. आवाजाचा त्रास लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. अन्य प्रकारेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. जुन्नर परिसरात बुलेट घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. बुलेटच्या मूळ सायलन्सरमध्ये जाणीवपूर्वक बदल करून मोठा आवाज करीत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वर्दळीच्या पेठा तसेच बाजारपेठांतून बुलेट चालविल्या जात आहेत. यामुळे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन होत आहे. परंतु या बुलेटराजांना याचा कोणताही फरक पडत नसल्याने ते वेगाने बुलेट चालवीत असतात.
शहर व परिसरातील अनेक दुचाकींना फॅन्सी नंबर प्लेट, मागची व पुढची नंबर प्लेट कोरी ठेवणे, नंबर प्लेटवर अधिकृत नंबर न टाकता वेगवेगळी नावे लिहिणे, वाहनांची कागदपत्रे, वाहन परवाना जवळ न बाळगणे, रात्रीच्या वेळी डोळ्यांना त्रास होईल असे प्रखर दिवे बसवून दुचाकी चालविणे, दुचाकींना सायरनसारखा आवाज येणारे हॉर्न बसवणे असे गैरप्रकारही होत आहेत. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नसून अशा गैरप्रकारांचे प्रमाण वाढत चालले आहे. जुन्नर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी दिवसभर शहरात असते. शहरात कोठेही वाहन तळाची व्यवस्था नसल्याने हे वाहनमालक कोठेही कशाही पध्दतीने सार्वजनिक रस्त्यांवर गाड्या पार्किंग करतात.
मनमानी पद्धतीने रस्त्यावर उभ्या केलेल्या या गाड्यांमुळे धान्य बाजार, नेहरू बाजार, सराई पेठ, रविवार पेठ, सदाबाजार पेठ, नवीन एसटी बस स्थानक परिसर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्याची गरज असून पोलिस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होण्याची मागणी होत आहे. केवळ बुलेटराजांचाच नव्हे तर सामान्य दुचाकींवरूनही शाळा, महाविद्यालयात जाणारी अल्पवयीन मुले गाडीवर तिघे-चौघे बसून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे मुले करतात म्हणून त्याचे अंधानुकरण करणार्या अल्पवयीन मुलींचेही प्रमाण भरपूर आहे. मुलीही वेगाने दुचाकी चालवितात, हेल्मेटचाही वापर नसतो. परिणामी त्यांना अपघाताची शक्यताही वाढली आहे.


