अकोला : देशाच्या फाळणीत लोकांवर झालेले अत्याचार, त्यांचे संघर्ष व बलिदानाचे स्मरण व्हावे, याकरीता हुतात्मा स्मारक येथे प्रदर्शनी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे लोकार्पण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज करण्यात आले.
महानगर पालिका व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने “विभाजन विभिषिका स्मृती दिना” निमित्त प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मनपा उपायुक्त पूनम कंळबे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे आदि उपस्थित होते.
भारताच्या इतिहासातील अत्यंत दुखद घटना म्हणजे भारताची फाळणी होय. या फाळणी दरम्यान लोकांवर झालेले अत्याचार, विस्थपितांचे दुख, तसेच अनेक बांधवाना आपले प्राण देखील गमवावे लागले. त्यांच्या या संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण व्हावे, याकरीता दि. 14 ऑगस्ट हा दिवस “विभाजन विभिषिका स्मृती दिन” म्हणून पाळला जातो. या स्मृती दिनानिमित्ताने हुतात्मा स्मारक, नेहरु पार्क, अकोला येथे नि:शुल्क प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत भारताच्या फाळणी बाबतचा घटनाक्रम सचित्र माध्यमातून मांडला असून आपल्या पूर्वजानी दिलेल्या बलीदानाची माहिती देण्यात आली आहे. तरी नागरिक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.


