अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी गिटार वादनातून राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतगायन करण्यात आले. तसेच सुत्रनेती योगीक शुद्धीक्रियाचे प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले. अशा उपक्रमातून प्रत्येक दिवस नवीन शिकण्याची उमेद निर्माण होतात, असे मनोगत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासन, क्रीडा अधिकारी, अव्दैत गिटार ॲकेडमी व अंजिक्य फिटनेस पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुचिता पाटोकार, आदि उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या 75 वा वर्धापनानिमित्त जिल्ह्यातील 75 गिटार वादकांव्दारे राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतगायन तसेच 75 नागरिकांव्दारे सुत्रनेती योगीक शुद्धीक्रीया प्रात्यक्षिक सादर केले. योग प्रचार व राष्ट्रीय भावना जनमानसात जागृत केल्याबद्दल गिटार वादक व सुत्रनेती योगीक क्रीयात सहभागी होणाऱ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रविण देशमुख व अजिंक्य फिटनेस पार्कचे धंनजय भगत यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.