ठाणे : गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप तसेच व्यासपीठ उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्ज सादर करण्यासाठी प्रभाग समितीमधील नागरी सुविधा केंद्रांवर एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी बैठकीत जाहीर केले. गणेशोत्सवापुर्वी रस्त्यावरील खड्डे भरणीची तसेच झाडांच्या फांद्या छाटणीची कामे करण्याबरोबरच गणेश विसर्जनघाटांवर विद्युत आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. अन्यथा परवानगी नाही असे गृहित धरुन महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त ए. एम. अंबुरे, दत्तात्रय कांबळे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, पालिका उपायुक्त मनीष जोशी, जी.जी.गोदेपुरे यांच्यासह महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महावितरणचे अधिकारी, गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि गणेश मुर्तीकार उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप तसेच व्यासपीठ उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अर्ज सादर करण्यासाठी प्रभाग समितीमधील नागरी सुविधा केंद्रांवर एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस व पोलीस प्रशासन यांचे प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील आणि संबंधित प्रभाग समितीकडून परवानगी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शर्मा यांनी यावेळी दिली. तसेच महावितरणनेही एक खिडकी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यवेळी केले. गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी शुल्क माफ करण्यासंबंधी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उत्सव किंवा कार्यक्रमास, मंडप, स्टेज व कमानी उभारण्याकरिता महापालिकेने सविस्तर कार्यपध्दती निश्चित केली असून ती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिका क्र.१७३/२०१० मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन सर्व उत्सव मंडळांनी करणे बंधनकारक असणार आहे, असेही पालिका प्रशासनाने सांगितले. यंदा गणेश मुर्तीच्या उंचीचे निबंध शासनाकडून हटविण्यात आलेले आहे. त्यामुळे गणेश मूर्तीचे आगमन व गणेश मूर्तीचे विसर्जन मार्गावरील उच्च दाब विद्युत वाहीनीची पाहणी करून कमी उंचीवर असलेल्या वाहीन्यांची उंची वाढविण्याचे काम तसेच सर्व गणेशोत्सव मंडळांना नियमानुसार वीज पुरवठा करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महावितरण विभागास दिल्या. गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत पोलीस विभागाकडून उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी यावेळी सांगितले. सण-उत्सवांच्या प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणारे मंडप, स्टेज व ध्वनी प्रदुषणाबाबत उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.१७३/२०१० च्या अनुषंगाने दिलेले आदेश व कायदेशीर तरतुदींची माहिती देण्याकरिता प्रभाग समिती स्तरावर मंडळांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
गणेश मुर्ती आगमन आणि विसर्जनदरम्यानची सुविधा, तेथील व्यवस्था आणि भेडसावणाऱ्या समस्या अशा व्यथा मंडळांचे प्रतिनिधींनी पालिका तसेच पोलिस प्रशासनापुढे मांडल्या. त्यावर या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले. तसेच करोना काळानंतर होत असलेल्या या उत्सवात मोठ्या जल्लोषात सहभागी होताना ठाण्याची उत्सवप्रियतेची सकारात्मक परंपरा कायम राखावी असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव काळात महापालिकेच्या परवानगी तसेच इतर व्यवस्था याबाबत काहीही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी पालिका उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परवानगीबाबत काही अडचणी असल्यास ८६५७८८७१०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.