महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : सध्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात दमदार बॅटींग चालू केली असून सर्वत्र पावसाचा कहर असताना नशीब बलवत्तर म्हणून पाच जणांचे प्राण वाचल्याची खळबळजनक घटना भद्रावती तालुक्यात दि.९ जुलै रोजी घडली.प्राप्त माहितीनुसार,दि.९ जुलै रोजी टाटा मॅजिक ऑटो भद्रावती वरून तालुक्यातील पानवडाळा येथे जात होता. या ऑटोत चालकासह पाच प्रवाशी प्रवास करीत होते. दरम्यान, दुपारी २ वाजताच्या सुमारास टाकळी-पानवडाळा या रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना ऑटो चालक डेकाटे याने पुलावरून ऑटो पुढे दमटला. त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वेगाने आला आणि ऑटोला नदीपात्रात घेऊन गेला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्वजण जिवाच्या आकांताने ओरडू लागले. त्या पाच पैकी एकाने प्रसंगावधान राखून ऑटो वाहायला लागताच ऑटोतून उडी मारुन स्वतःचा बचाव केला. तर उर्वरीत चार जण ऑटोमध्येच अडकून पडले. वाचवा-वाचवा अशी ओरड चालू असतानाच टाकळी आणि पानवडाळा या दोन गावातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यापैकी एकाने पानवडाळा येथील सुधाकर काळे यांच्या मोठ्या मुलाला भ्रमणध्वनीवरून ऑटो नदीत बुडाल्याची माहिती दिली. त्या मोठ्या मुलाने आपला लहान भाऊ निखिल सुधाकर काळे याला माहिती देताच तो क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाला. लगेच त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली व एकाएकाला बाहेर काढून दोराच्या सहाय्याने काठावर आणले. निखिलला पोहता येत नव्हते, तरी केवळ दुस-यांचा जीव वाचविण्याच्या ईर्षेने त्याने पाण्यात उडी घेतली होती. निखिल हा भारतीय लष्करात सैनिक असून तो आपल्या पानवडाळा या गावी सुट्टीवर आला आहे. भद्रावती येथील शिंदे महाविद्यालयात त्याने बी.ए.प्रथम वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर तो सैन्यात भरती झाला. ३० वर्षीय निखिल मागील ११ वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहे. त्याने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र पुलावरून पाणी वाहत असताना बेजबाबदारपणे वाहन टाकणा-या अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी नागरिक करीत आहेत. चूक चालकाची आणि इतर प्रवाशांचा नाहक जीव गेला असता अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.