मुंबई : ‘ईडी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली.त्यानंतर त्यांना अटकही कारण्यात आली. आता ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती खालावली आहे. पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्ड्रींग) प्रकरणी बुधवारी अटक केली़. त्यानंतर गुरुवारी त्यांनी केलेल्या काही मागण्या सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलएने मान्य केल्या. दाऊद इब्राहीमने क्रिकेट सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केला. त्यावर ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना दुपारी अटक केली. रात्री उशीरापर्यत सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली. तेव्हा, मलिक यांच्यावतीने काही मागण्या न्यायालयाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, न्यायालयाने वेळेअभावी सुनावणी तहकूब केली होती. त्यावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. तेव्हा, मलिक यांचे वय पाहता त्यांना सोबत औषधे, ईडीच्या कोठडीत घरचे जेवण आणि चौकशीदरम्यान वकिलांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांच्यावतीने करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने त्यांच्या तिन्ही मागण्या मान्य करत मलिक यांना दिलासा दिला आहे. आज अचानक नवाब मलिकांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.