इचलकरंजी : मुलीने जन्मदात्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीत घडली. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे (वय ४० रा.सुगंधा पाटील मळा) असे मृत बापाचे नाव आहे. या मुलीने तिच्या वडिलांच्या डोक्यात बॅट आणि कटावणीसारख्या शस्त्राने वर्मी घाव घातला. यामध्ये शांतिनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा खून केल्यानंतर कबुली देण्यासाठी घरातून आरोपी साक्षी आईसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाली. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुगंधा पाटील मळ्यात राहणारे शांतिनाथ केटकाळे हे शेती करतात. त्यांना तीन मुली आहेत. काही दिवसांपूर्वी मोठी मुलगी साक्षीसाठी घरालगत केवा नावाचे मार्ट सुरू करून दिले. साक्षीच्या विवाहासाठी स्थळपाहणीही सुरू होती. अनेक दिवसांपासून मोठी मुलगी साक्षी केटकाळे आणि शांतिनाथ केटकाळे यांच्यामध्ये सतत वाद व्हायचा. मंगळवारी पुन्हा सायंकाळी त्यांच्या घरात अचानकपणे वाद सुरू झाला. वादातूनच साक्षीने वडील शांतिनाथ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यात कटावणी व बॅटने मारहाण करून गंभीर जखमी केले. ते जागीच कोसळले. घरातील भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले. नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमले. नातेवाईकांनी शांतिनाथ यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याची मिळताच घटनास्थळी शिवजीनगर पोलिसांचे पथक हजर झाले. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांनी आयजीएम रुग्णालयासह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, मृत शांतीनाथ याच्या खुनाची कबुली देत साक्षी आईसह स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाली. याबाबत नातेवाईकांशी चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कौटुंबिक वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. खुनानंतर मुलीसह आई गायब मुलगी साक्षीने वडिलांचा खून केला आणि त्यानंतर तिने आईसह कोणालाही न सांगता घर सोडले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने शांतिनाथ यांचा खून झाल्याचे त्यांच्या वृद्ध आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर साक्षी व तिच्या आईचा नातेवाईकांनी शोध घेतला असता त्या पोलीस ठाण्यात असल्याचे समजले. मुलीने खुनाची कबुली आणि खून कौटुंबिक वादातून झाला असला तरी याबाबत पोलिसांनी सर्व बाजूंनी तपासाला गती दिली आहे.