अनेक आदिवासींची फसवणूक, अडगाव बु शाखेतील प्रकार
क्षेत्रीय प्रबंधकांच्या तक्रारीवरून तत्कालीन अधिकारी, दलालांसह 11 जणांवर गुन्हे दाखल, तिघांना अटक इतर फरार
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या
आदिवासींना कर्ज वाटप प्रकरणात सेंट्रल बँकेच्या अडगांव बु. शाखेत तत्कालीन अधिकारी आणि दलालांनी मिळून 35 लक्ष रुपयांच्या वर घोटाळा केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली आहे….
अडगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत कर्जवाटपात बरेच गैरप्रकार झाल्याची ओरड अनेक महिन्यांपासून होत होती. यामध्ये अनेक आदिवासी बांधवांची पिळवणूक होत असल्याची चर्चा यावेळी होती….दरम्यान बँकेच्या चौकशी आणि ऑडिट मध्ये अनेक आदिवासी बांधवांची फसवणूक करून बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि दलाल आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून 35 लाखाच्यावर घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अकोलाचे क्षेत्रीय प्रबंधक विद्याधर पेडणेकर यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि बँकेचे तत्कालीन अधिकारी, दलाल, एजंट, आणि त्यांना सहकार्य करणारे इतर काही लोक असे एकूण अकरा जणांविरोधात हिवरखेड पोलिसांनी भादवी कलम 420, 409 अन्वये गुन्हा दाखल केला…. त्यापैकी गजेंद्र रामकृष्ण गावंडे हिवरखेड, दीपक सत्यनारायण भिलावेकर चिपी, दिवाकर देवमन मंगळे बेलुरा, ह्या तीन आरोपींना हिवरखेड पोलिसांनी अटक केली… तर क्षेत्रीय प्रबंधक तक्रार देत असल्याची माहिती काही शुभचितकांनी अथवा लाभार्थींनी मुख्य सुत्रधारांना वेळीच दिल्याने मुख्य सूत्रधार रातोरात फरार होण्यात यशस्वी झाले असावेत अशी चर्चा आहे.
आरोपींनी आदिवासी लोकांना बँकेतून शेतीवर कर्ज आणि सिंचनासाठी कर्ज मिळवून देतो असे प्रलोभने देऊन आदिवासी लोकांच्या कागदपत्रांवर सह्या सह्या आणि आंगठे घेऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अडगाव येथून कर्ज काढून घेऊन कर्ज काढलेल्या रकमांचा स्वतःसाठी उपयोग करून घेतला व आदिवासी शेतकरी लोकांना शेती उपयोगी साहित्य न देता ते त्यांना दिल्याचे रेकॉर्डला दाखविले. अश्याप्रकारे कित्येक आदिवासी शेतकरी लोकांची फसवणूक केली असल्याचे बँकेच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे….
सध्या 11 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले…संपूर्ण प्रकरणाचा तपास ठाणेदार धीरज चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल दातीर, विठ्ठल वाणी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत….तर..
अकोट येथील दिवंगत प्रहार नेते तुषार पुंडकर यांनी आदिवासींच्या व्यथा लक्षात घेऊन त्यावेळी हा मुद्दा लावून धरला होता आणि भ्रष्ट अधिकारी आणि दलालांचा चांगलाच समाचार घेतला होता…पण त्यांच्या निधनानंतर हे प्रकरण थंडबस्तात पडले होते…तर…
याप्रकरणी अटक न झालेल्या इतर आरोपींची नावे प्रसार माध्यमांना सांगण्यास हिवरखेड पोलीस तयार नाहीत…याप्रकरणी फिर्यादी सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक विद्याधर पेडणेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आम्हाला पोलिसांनी कोणालाही कोणतीही माहिती देऊ नये असे सांगितले…त्यामुळे ह्या लक्षावधी रुपयांचा घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहेत त्यामध्ये काही मोठे मासे असण्याची शक्यता आहे… त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे…
हे प्रकरण इथेच न थांबता यामध्ये आणखी तक्रारी झाल्यास या घोटाळ्याची पाळेमुळे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही….


