मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या दैनंदिन वाढ ही चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. दरदिवशी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारची झोप उडाली आहे. काल राज्यात कोरोनाचे पाच हजारांहून अधिक रुग्ण सापडले, त्यामुळे आता राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या शाळा बंद होणार का, मुंबईतील लोकलसेवेवर मर्यादा येणार का, लॉकडाऊन लागणार का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. मात्र लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती विस्फोटक आहे. रुग्णवाढीचा आलेख वेगाने वाढत आहे. रुग्णदुप्पटीचा वेग एका दिवसावर आला आहे. रुग्णवाढीचा झपाटा पाहता जर आपण वेळीच निर्बंध घातले नाहीत तर राज्यात जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसेच ज्या वेगाने हा आजार पसरतोय ते पाहता आता नियम पाळण्याची जबाबदारी जनतेवर आहे. जर नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय उरणार नाही. त्यामुळे निमय पाळायचेत की पाळू नये, हे लोकांनी ठरवावं. लोकल काही काळापूर्वीच सुरू केल्यात आणि रुग्णवाढ झाली. आता तिसरी लाट आली आहे. आता पुन्हा एकदा लोकल आणि शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल तो सगळ्यांचा विचार करूनच. लॉकडाऊनची स्थिती आता येत आहे ते कधी करायचं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्येने गुरुवारी पाच हजारांचा आकडा पार केला, तर सक्रिय रुग्णसंख्याही १८,२१७ वर पोहोचली आहे. राज्यात ५,३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात दिवसभरात १,१९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६५,०७,३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के, तर मृत्युदर २.१२ टक्के झाला आहे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,७०,७५४ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ५१८ इतका आहे.