मुंबई : राज्यात थंडीची लाट सुरू झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
शेतपिकांसह अन्य बाबींना थंडी पोषक आहे. उबदार कपड्यांसह पोषक वस्तूंच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. मात्र, आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्याने अनेक जिल्ह्यांमधील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरणार आहे. कारण, येत्या २८ डिसेंबरला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज २७ डिसेंबरला विदर्भात पावसाच्या तुरळक सरी कोसळणार आहेत. तर, २८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तसेच, यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच, यासंदर्भात हवामान विभाकडून देण्यात येणाऱ्या माहिती आणि अंदाजाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.