किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
हिवराळे परिवाराचा पुढाकार
अभ्युदय फाउंडेशन देणार सेवा
पातूर : अंत्यविधी किंवा दशक्रिया विधीसाठी स्मशानभूमीत येणाऱ्या वृद्ध व दिव्यांग नागरिकांच्या सोईसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. अकोला येथील हिवराळे परिवाराने पातुरच्या स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या अभ्युदय फाउंडेशनला ही व्हील चेअर समर्पित केली आहे.
अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते मनीष हिवराळे यांचा मुलगा स्व आर्य मनिष हिवराळे याच्या स्मृती प्रित्यर्थ व्हील चेअर चा लोकार्पण सोहळा व सामाजिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. पातूर येथील वैकुंठधाम येथे सेवा देणाऱ्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने संकल्प यज्ञव्दारे नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार संस्थेने पातुरच्या स्मशानभूमीत अंत्यविधी किंवा दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या दिव्यांग व वृद्ध नागरिकांना सोईचे व्हावे यासाठी व्हील चेअर च्या मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हिवराळे परिवाराने ही व्हील चेअर अभ्युदय फाउंडेशन ला समर्पित केली. यावेळी अभ्युदय फाउंडेशनच्या आवाहनानुसार हिवराळे परिवाराने सर्व स्मशानात कार्यरत कर्मच्याऱ्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कपडे, स्वेटर, हॅन्डग्लोज, शाल देऊन मिठाई चे वाटप केले.
त्यांनतर किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा हिवराळे ज्वेलर्सचे संचालक मनिष हिवराळे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून ए बी पी माझा चे जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोणे, लिलाताई हिवराळे, उद्योजक मधुकर बोडदे, अश्विन मिश्रा, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, किड्स पॅराडाईज च्या कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेले शिव संजय यादव, पुष्पराज काढोणे, आदर्श पेंढारकर, तसेच तलावात दोघांचे जिव वाचवीणारा गौरव श्रीनाथ, दिल्ली येथे राजपथवर कलाकृती सादर करून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनय बगळेकर यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्तविक गोपाल गाडगे यांनी केले तर संचालन चंद्रमणी धाडसे यांनी केले.
यावेळी बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, संतोष लसनकर, अक्षय लसनकार, शुभम पोहरे, रुपाली पोहरे आदींनी परिश्रम घेतले.