वाशिम, दि. 24 : पतंग उडविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयातीवर राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाच्या 11 जुलै 2017 च्या आदेशानुसार पुर्णपणे बंदी आणलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 15 डिसेंबर 2021 रोजी आदेश देवून नायलॉन मांजा बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शहरात विशेष पथकाची स्थापना करण्याबाबत कळविले.
जिल्हयात व्यापक जनजागृती करण्यासाठी आणि नायलॉन मांजा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल), सर्व तहसिलदार आणि नगर पालीका प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांची या विशेष पथकात नेमणूक करण्यात आली आहे.
नायलॉन मांजाचा सर्रास उपयोग केला जात आहे. व्यापारी नायलॉन मांजाची लपुन छपुन विक्री करीत आहे. त्यामुळे सदर बाब उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर यांनी गंभीरतेने घेऊन विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले असून या विशेष पथकातील अधिकारी नायलॉन मांजा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणार आहे.