वाशिम, दि. 24 : कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनिम 1897 लागू करण्यात आल्याबाबतची अधिसूचना 14 मार्च 2020 च्या अधिसूचनेनुार नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. 17 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार एकत्रित सुधारीत मार्गदर्शन सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या आहे. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हयात कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 नुसार जिल्हयात नाताळ सणानिमित्त पुढीलप्रमाणे आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीदेखील नाताळचा सण आरोग्याच्या दृष्टीने पुर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा. कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या 27 नोव्हेंबर 2021 च्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. नाताळ/ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध बैठक क्षमतेच्या 50 टक्केपर्यंत लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल आणि मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अन्य काही वस्तू ठेवल्या जातात, त्याठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचे स्तुतीगीत गाण्यासाठी कमीत-कमी गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळया माईकचा वापर करुन सामाजिक अंतराचे पालन करावे. चर्चच्या बाहेर/परिसरात दुकाने वा स्टॉल लावू नये. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतीक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे. कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील पालन करण्यात यावे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचेवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.