अमरावती, दि. 21 : बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी तक्रारींवरील कार्यवाहीबरोबरच स्यू- मोटो कारवायाही कराव्यात. याविषयी स्थापित समितीने स्वत:हून पुढाकार घेऊन कारवाया केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या पदव्या, नोंदणी आदी बाबींची तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंध समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. विजय अजमिरे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण डुंबरे, पोलीस उपअधिक्षक प्रदीप सूर्यवंशी, अन्न व औषधे प्रशासनाचे सहायक आयुक्त उमेश घलोटे, डॉ. विशाल काळे आदी उपस्थित होते.
बोगस डॉक्टरांविरुद्धच्या तक्रारींची दखल घेत अद्यापपर्यंत 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार तक्रारी प्रलंबित आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, केवळ तक्रारींची वाट न पाहता तालुका समित्यांनी पुढाकार घेऊन तपासणी करावी. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची कागदपत्रे तपासावीत. तालुका आरोग्य अधिका-यांनी यासाठी अधिक प्रभावीपणे काम करणे अपेक्षित आहे. तसे पत्र जिल्हा समितीकडून तालुका समित्यांना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
‘आयएमए’चे सहकार्य घ्यावे
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढेही परिपूर्ण कारवाई झाली पाहिजे. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्धच्या मोहिमेत इंडियन मेडिकल असोसिएशनचेही सहकार्य मिळवावे. तसे पत्र असोसिएशनला देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.