सानेगुरुजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तेथील कार्यकर्त्यांनी वाहिलेली कृतिशील आदरांजली पाहून त्यातल्या एका कार्यकर्त्याने त्यात थोडा बदल करून तोच प्रयोग एका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेत केला. डॉ. बाबासाहेबांची शिक्षणापासून, सामाजिक लढा ते तत्त्वचिंतनापर्यंतची विविध पुस्तके मुलांना वाचायला दिली. एका महिन्यानंतर, पुस्तकातला कोणता विचार तुम्हाला स्वतःला परिवर्तनासाठी प्रेरक वाटला, हे पंधरवड्यात एका कागदावर लिहून द्या, असे सांगितले. विद्यार्थी-युवकांनी स्वतःला प्रेरक वाटलेल्या परिवर्तनशील विचारांची पोस्टर्स करून प्रदर्शन भरवले. निदान त्या तीस युवकांनी पुन्हा नव्याने डॉ. बाबासाहेबांचे लेखन वाचले.
प्रज्ञावंत डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचार जाणून घ्यायचे असतील, तर इंग्रजीतून लििहलेली त्यांची ग्रंथसंपदा वाचा. ते स्वतः कसे घडले, ते अभ्यासा. अनेक प्रेरणादायी कोट्सपैकी एक, माझा तुम्हाला अंतिम संदेश एकच, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा होय. कारण त्यावेळी बहुजन मागासवर्गास शिक्षणासाठी त्रास होत होता. गरिबी, निरक्षरता आणि जातीयतेच्या कलंकामुळे बहुजन समाजाला सतत अन्याय, अपमान, छळ सहन करावा लागत होता. त्यांची गरिबी आणि निरक्षरता हे त्यांच्या गुलामगिरीचे मूळ होते. शिकल्याशिवाय आपल्यावर काय अन्याय होतो, हे कळत नाही. शिक्षण मानवाला आपल्या हक्कांची जाणीव करून देतो. यासाठी शिक्षण आवश्यक आहे, हे डॉ. बाबासाहेब स्वतः जाणत होते. संघर्षमय जीवनाला सामोरे जात, अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेत असताना बाबासाहेबांचा पदोपदी अनेकदा मानभंग झाला. रास्त हक्कांपासून वंचित केले गेले तरी त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. स्वतःची लायकी विद्यार्थीदशेतच वाढवली. महात्मा जोतिबा फुले यांची शिकवण डोळ्यांसमोर होती. शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध’ का म्हटले ते लक्षात आले. अन्याय असेल, तेथे वाघ गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे, हे ओळखून कुरबूर न करता स्वतःची उन्नती साधत वयाच्या २२व्या वर्षी ते अमेरिकेत गेले. कोलंबिया विद्यापीठ, लंडन अशा अनेक ठिकाणी जाऊन विधी, अर्थ, राज्य आदी शास्त्रांच्या विविध ज्ञानाच्या शाखेत प्रभुत्व संपादन केले. शिक्षणाच्या मदतीने आपण प्रस्थापित व्यवस्थेत आपले स्थान निर्माण करू शकतो, हे ओळखून त्यांनी स्वतःच्या शिक्षणांवरही खूप भर दिला होता. त्यासाठी ते साऱ्यांना शिका, शिक्षण घ्या, असे सांगत होते. त्यांची दिशा त्यांच्या डोळ्यांसमोर स्पष्ट होती. स्वतः अनुभवलेले दुःख माझ्या बांधवांच्या वाट्याला येऊ नये, आपल्या बांधवांमध्ये शिक्षणाचा प्रसार करायला, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, जातीचे उच्चाटन करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी म्हणून ते भारतात आले. डॉ. बाबासाहेब म्हणतात, “आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि अंतिमतः ही भारतीय आहोत.”
युवकांनो, आजच्या बदलत्या स्पेशलायझेशन काळात ज्ञानाच्या शाखा विस्तारल्यात, जग जवळ आले आहे, तेव्हा ‘शिकाल तर जगाल.’ डॉ. बाबासाहेबांची आधुनिक भारत घडविण्याची दिशा जशी निश्चित होती, तशी तुम्हा सर्वांची स्वतःच्या करिअरची दिशा निश्चित हवी. जो वाघिणीचे दूध पितो, तो जग जिंकतो. तेव्हा युवकांनो शिका, शिकण्यासाठी बाहेर पडा. शिकताना जेवढा संघर्ष बाबासाहेबांना करावा लागला तो आज नाही; परंतु स्पर्धा आहे. सातत्याने युवकांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणतात, “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करते, तर पुस्तक तुम्हाला जगायचे कसे ते शिकविते तसेच हे लक्षात घ्या, मनुष्य उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाच्या अभावाने जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो, ते टाळा!” त्यांच्या प्रेरणादायी विचाराला तत्त्वज्ञानाची, कृतीची जोड होती.
डॉ. बाबासाहेब उत्तम पुस्तकप्रेमी होते. ५०,०००च्या वर पुस्तकांचा साठा त्यांच्याजवळ होता. त्याचे राजगृहघर मुंबईतील सर्वात मोठे ग्रंथालय आहे. १८-१८ तास ते पुस्तक वाचीत होते, अभ्यास करीत होते तसेच त्यांच्या हातात कायम चार पुस्तके व एक वृत्तपत्र असायचे. कुठेही ते वेळ फुकट घालवत नसत, हे आपण लक्षात ठेवत नाही आणि शिकतही नाही. युवकांनो स्वतःलाच प्रश्न विचारा, मी यात बसतो का? आज काळानुसार आपल्या हातात मोबाईल असतो; परंतु त्याचा उपयोग स्वतःच्या करिअरसाठी करता का? १५ वर्षांची मुलगी, आर्थिक स्थिती कठीण, घरातील सर्व काम करताना मोबाईलवरील गाणी ऐकत स्वतःची गाण्याची आवड विकसित केली आणि मराठी इंडियन आयडॉलमध्ये आली. शिक्षणाशी संबंधित डॉ. बाबासाहेबांनी आपल्या बांधवांना सांगितले,
१ ‘शिका आणि पुस्तक वाचा. वाचनाने ज्ञान वाढते. कोणत्याही समस्येवर उत्तर मिळते.’ त्यातूनच “वाचाल तर वाचाल” हा मौल्यवान संदेश दिला.
२ संघटित व्हा : आजही न्याय हक्कांसाठी, काही मागण्यांसाठी, क्रांतीसाठी, प्रगतीसाठी संघटन लागते. संघटित व्हा, एकोप्याने राहा. आज तुम्हाला काही मिळवायचे असेल, तर स्वतःच्या शरीरावर, मनावर नियंत्रण ठेवणे. काया-वाचा-मनाने संघटित होण्याची आवश्यकता आहे.
३ संघर्ष करा : मागास वर्गास शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. हक्कांसाठी, प्रगतीसाठी प्रत्येकाला संघर्ष अटळ आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे सांगताना डॉ. बाबासाहेब आपल्या बांधवाना म्हणाले, आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे.
धर्माविषयी बोलताना डॉ. बाबासाहेब म्हणतात, “मी असा धर्म मानतो, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो.” पुढे म्हणतात, “धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.” हा विचार ‘मानवता’ हा श्रेष्ठ धर्म आहे, हे सुचवितो. त्यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ त्याबरोबरच “शिका, वाचा आणि विचार करा.” शिका म्हणजे फक्त डिग्र्या घेणे नव्हे, तर औपचारिक शिक्षणाबरोबर परिवर्तनाचा लढा शिका.
१. बोलण्याआधी ऐका – शिका, २. लििहण्याआधी – वाचा, ३. मत व्यक्त करण्याआधी – विचार करा.
“शिका, वाचा आणि विचार करा.”
अमेरिकेच्या जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना “ज्ञानाचे प्रतीक” म्हणून मान्यता दिली असून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये त्यांचा पुतळाही बसविला आहे. जगातील सारे लोक त्यांच्याकडे “A symbol of knowledge and sign of inspiration” या नात्याने आदराने पाहतात.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात, सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यादृष्टीने स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. ‘कायद्यापुढे सर्व समान’ ही संकल्पना जनमानसांत दृढ केली आणि आज प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बहाल केला. अशा या थोर समाजउद्धारक, दलितांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे महामानव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या (६ डिसेंबर) “महापरिनिर्वाण दिन.”
माझे त्यांना त्रिवार अभिवादन !!