गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठा येथील पांढरी या भागातील नागरिकांना शासनाने तेल्हारा शहराच्या हद्दी मध्ये समाविष्ट केले होते परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांना सरपंच व न.प. मुख्याधिकारी यापैकी कोणीच शासकीय दाखला देण्यास तयार नव्हते त्यामुळे तेथील नागरिक शासनाच्या अनेक योजनान पासून वंचित राहिले होते याबाबत तेल्हारा विकास मंचने पुढाकार घेवून तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे भक्कमपणे बाजू मांडल्यानंतर पांढरी येथील नागरिकांना आठ दिवसाच्या आत प्रथमच शासकीय दाखला मिळाल्यामुळे तेथील नागरिकांचे पुढील प्रश्न मार्गी लागणार आहेत.कोठा गावातील पांढरी हा भाग हद्द वाढीमध्ये तेल्हारा शहरात समाविष्ट झाला आहे. परंतु त्यांना साधा रहिवासी दाखला नगरपालिका व कोठा येथील ग्रामपंचायत सुद्धा देत नव्हते. त्यामुळे आमचा वाली कोण असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. तसेच जन्म-मृत्यूची नोंद सुद्धा कोठा ग्रा.प. व तेल्हारा न. प. मध्ये होत नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे तेल्हारा शहरामध्ये नागरिकांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या पाढरी येथील नागरिकांना देण्यात याव्यात अशा प्रकारचे निवेदन कोठा गावातील पांढरी या भागातील नागरिकांनी व तेल्हारा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना आठ दिवसांपूर्वी दिले होते. सदर मागणीचे निवेदन दिल्यानंतर त्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा व पांढरी येथील नागरिकांची बाजू भक्कमपणे तेल्हारा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्यापुढे मांडल्यानंतर तहसीलदारांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांनी पांढरी येथील नागरिकांनच्या मुलाला प्रथमच शासकीय दाखला प्रमाणपत्र दिल्यामुळे पांढरी येथील नागरिकांचे पुढील प्रश्न मार्गी लागणार आहेत.