दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद, दि.16 सर्व काही तयारी पूर्ण झालेली असताना…. थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात शिक्षकांच्या वेतनाचे बजेट जमा असताना केवळ उदे ए. डी. या एका कारकुनाच्या गैरहजेरीमुळे जिल्हाभरातील हजारो शिक्षकांचे वेतन जाणीवपूर्वक लांबवले गेले. आज शिक्षक सेनेच्या वतीने खाली खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली.
उदे ए.डी. या कारकुनाने जेव्हापासून शिक्षण विभागातील शिक्षकांच्या मासिक वेतनाच्या जबाबदारीचा टेबल घेतलेला आहे, तेव्हापासूनच दिवसेंदिवस शिक्षकांचे वेतन अधिकाधिक उशिराने जमा होत आहे.
यावर पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने वारंवार केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत उत्कृष्ट निर्णय घेऊन सीएमपी प्रणालीद्वारे वेतन करण्यास मान्यता दिली. मात्र तरीही या प्रणालीतही जाणीपूर्वक चुका व दिरंगाई करण्याचा प्रकार सदरील कर्मचाऱ्याकडून होत आहे.
दरमहा कोषागारात द्यावयाच्या देयकात अपूर्तता ठेवणे, लवकर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा न करणे, वित्त विभागाकडे द्यावयाच्या देयकात विलंब करणे, विभाग प्रमुख शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवणे, रजा पूर्व मंजुरी न घेता परस्पर रजेवर जाऊन शिक्षकांना वेठीस धरणे, असे एक ना अनेक प्रकार सदरील कर्मचाऱ्याकडून जाणीवपूर्वक केले जात आहेत. विभाग प्रमुख यांच्या शीही याबाबत चर्चा केली असता ते ही याबाबत हतबल झाल्याचे दिसून येत आहे. कालही संबंधित कर्मचाऱ्याने केवळ रजेचा अर्ज ठेऊन पूर्व मंजुरी न घेता नियमबाह्य रीतीने आज दिवसभर परस्पर कार्यालयातून पोबारा केला आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यानेच सदरील कर्मचारी बेलगाम होत असल्याचा आरोप शिक्षक सेनेकडून करण्यात आला आहे.
तरी सदरील कर्मचाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कडक कारवाई करून या कर्मचाऱ्याकडील पदभार काढून सक्षम कर्मचाऱ्याकडे तातडीने देण्यात यावा, तसेच मुख्याध्यापक स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सीएमपी प्रणाली साठीच्या जबाबदारीची अधिकृत निश्चितीकरणही करण्यात यावे, अशी अत्यंत आक्रमक मागणी शिक्षक सेनेकडून जिल्हाध्यक्ष दीपक पवार, संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, तालुकाप्रमुख अमोल एरंडे तसेच यावेळी उपस्थित जे.के.चव्हाण, रमेश ठाणगे, ज्ञानेश्वर आंधळे आदींकडून करण्यात आली आहे.


