सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनिधी कासारखेड
हिवरा आश्रम : कोविड – १९ चा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला असून या महामारीचा प्रादुर्भाव शहर आणि ग्रामीण भागात मोठा प्रमाणात झाला. यामध्ये सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कित्येक कुटुंबातील रुग्णांना न परवडणारा खरे करून वैद्यकीय उपचार करावा लागले. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अश्या गोरगरीब लोकांनी कोरोनाच्या उपचारासाठी अदा केलेल्या बिलांची रक्कम परत करुन दिलासा द्यावा अशी मागणी हिवरा आश्रम येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. निलेश निकस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना १४ जून रोजी ई-मेल करून पाठवलेल्या निवेदनातून निकस यांनी जनतेच्या व्यथा मांडल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली आणि गोरगरीबांना लुटून गेली. त्यामध्ये पुन्हा लॉकडाऊनची भर पडली. सरकारी नोकरदार वर्गाला त्यांच्या विभागामार्फत उपचारासाठी लागलेली बिले परत मिळतात. त्याचबरोबर धनदांडग्या लोकांनी आपले इन्शुरन्स काढून ठेवले होते. त्यांनासुद्धा त्यामार्फत मदत मिळते. परंतु, गोरगरीब , मोलमजुरी करणारे आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांना अशी कुठली सुविधा नाही. काही योजना त्यांच्यासाठी आहेत पण त्यांचा कशाप्रकारे लाभ घ्यावा हे त्यांना माहीत नाही. योजनांचा पाठपुरावा करणे आणि कागदपत्र गोळा करणे सुद्धा एक प्रकारे जटिल प्रक्रिया आहे. बर्याच गोरगरीब लोकांनी दागिने विकून, शेत जमिनी गहाण ठेवून उपचार घेतले. अश्या लोकांचे काटेकोर सर्वेक्षण शासनाने करावे आणि गरजू व पात्र आर्थिक दुर्बल कुटुंबांना कोरोनावरील उपचारासाठी खरे झालेल्या बिलांची रक्कम परत करून दिलासा द्यावा अशी मागणी प्रा. निलेश निकस यांनी केली आहे.


