मुंबई :
राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, प्रशासनातील अधिकारी, एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते.
बैठकांचे सत्र हे चार वाजता संपलं. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री अनिब परब हे अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले आहेत. बैठकी दरम्यान कर्माचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव हा राज्य शासनातर्फे एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावापेक्षा एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीगीकरण करावे ही भुमिका एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे. तर राज्य शासनाच्या प्रस्तावावर थेट प्रतिक्रिया देण्याचे आमदार पडळकर यांनी टाळले आहे. सरकारने अधिकृत भुमिका जाहीर केल्यावर प्रतिक्रिया देऊ असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे.
दरम्यान आज संध्याकाळी सहा वाजता सह्याद्री अतिथीगृहात परिवहन अनिल परब यांची पत्रकार परिषद होणार आहे. तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत, संपाबाबत, मागणण्यांबाबत राज्य शासन नव्याने काय भुमिका मांडतं हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य शासनाच्या भुमिकेनंतर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी काय पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.