लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन झाले. ३४१ किलोमीचर लांबीचा हा एक्स्प्रेस वे पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशला जोडत आहे. लखनऊमधील चांद सराय येथून सुरू होऊन तो गाझीपूरला पोहचतो. याच्या निर्मितीसाठी २२ हजार ४९७ कोटी रुपये खर्च आला आहे. हा एक्स्प्रेस वे लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपुर, आंबेडकरनगर, आझमगढ, मऊ आणि गाझीपूर या ९ जिल्ह्यातून जातो. जुलै २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर आज मोदींच्या हस्ते या एक्स्प्रेस वेचं उद्घाटन झालं. यावेळी कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान मोदींनी उत्तरप्रदेशची भरभरून स्तुती केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ”संपूर्ण जगात ज्या उत्तरप्रदेशच्या ज्या सामर्थ्यावर, उत्तर प्रदेशच्या लोकांच्या सामर्थ्यावर ज्यांना जराही शंका असेल, त्यांनी आज इथे सुलतानपुरमध्ये येऊन उत्तर प्रदेशचे सामर्थ पाहू शकतात. तीन-चार वर्षांपूर्वी जिथे केवळ जमीन होती. आता तिथून एवढा आधुनिक एक्स्प्रेस वे जात आहे. जेव्हा तीन वर्षे अगोदर मी पूर्वांचल एक्स्प्रेस वे चं भूमिपूजन केलं होतं. तेव्हा हा विचारही केला नव्हता की एक दिवस त्याच एक्स्प्रेस वे वर विमानाने मी स्वतः उतरेल. हा एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशला जलगतीपेक्षाही अधिक चांगल्या भविष्याकडे घेऊन जाईल. हा एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशच्या विकासाचा, प्रगतीचा, नव्या उत्तर प्रदेशच्या निर्माणाचा, उत्तर प्रदेशच्या मजबुत होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा एक्स्प्रेस वे आहे. आणि हा एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशमधील आधुनिक प्रतिभेचे प्रतिबिंब आहे, उत्तर प्रदेशच्या दृढ इच्छा शक्तीचे प्रगटीकरण आहे. उत्तर प्रदेशमधील संकल्प सिद्धीचे प्रमाण आहे. हा उत्तर प्रदेशची शान आहे, उत्तरप्रदेशची कमाल आहे.”
तसेच, ”मी आज पूर्वांचल एक्स्प्रेस वे ला उत्तर प्रदेशच्या लोकांना समर्पित करताना, स्वतःला धन्य समजत आहे. देशाचा संपूर्ण विकास करण्यासाठी देशाचा संतुलीत विकास देखील तेवढाच आवश्यक आहे. काही क्षेत्र विकासाच्या शर्यतीत पुढे जातील आणि काही क्षेत्र अनेक दशकं मागे राहातील, ही असमानता कोणत्याही देशासाठी ठीक नाही. भारतात देखील जो आपला पूर्व भाग राहिलेला आहे, हा पूर्व भारत ईशान्येकडील राज्य विकासाची एवढी शक्यता असूनही या क्षेत्रांना देशात होत असलेल्या विकासाचा तेवढा लाभ मिळाला नाही जेवढा मिळाला पाहिजे होता.” असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.
”मी उत्तरप्रदेशचे उर्जावान कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यांची टीम व उत्तर प्रदेशच्या लोकांना पूर्वांचल एक्स्प्रेस वे बद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या ज्या शेतकरी बांधवांची जमीन यासाठी लागली आहे, ज्या कष्टकऱ्यांनी यासाठी घाम गाळला आहे, ज्या अभियंत्यांचे कौशल्य यामध्ये लागले आहे, त्यांचे देखील मी खूप खूप अभिनंदन करतो.” असं म्हणत मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले.
याचबरोबर, ”बंधू-भगिनींनो जेवढी आवश्यक देशाची समृद्धी आहे, तेवढीच आवश्यक देशाची सुरक्षा देखील आहे. इथे थोड्याचवेळात आपण पाहणार आहोत, की कशाप्रकारे आता आपत्कालीन परिस्थितीत पूर्वांचल एक्स्प्रेस वे आपल्या वायुसेनेसाठी आणखी एक ताकद बनला आहे. आता काही वेळातच पूर्वांचल एक्स्प्रेस वे वर आपले लढाऊ विमानं उतरतील. या विमानाची गर्जना त्या लोकांसाठी देखील असेल, ज्यांनी देशात डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चरला दशकांपर्यंत दुर्लक्षित केलं.” असं देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलून दाखवलं.