मुंबई : राज्यात शनिवार दिवसभरात ६६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८९६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५८,०४५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६ टक्के एवढा झाला आहे.
आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१६,७६२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,४०,३७२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३१,७५,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१६,७६२ (१०.४७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४८,८८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी एकूण १४,७१४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दादरमध्ये नऊ नवे बाधित
धारावी पॅटर्नमुळे दाट झोपडपट्टीतही अनेकवेळा शून्य बाधित रुग्णांचा विक्रम कायम आहे. मात्र सतत गजबजलेल्या दादर परिसरात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. दादर परिसरात शनिवारी नऊ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
मध्यवर्ती ठिकाण आणि मोठी बाजारपेठ असल्यामुळे दादर परिसरात कायम लोकांची गर्दी असते. तर आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्ट्यापैकी एक असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र जास्तीत जास्त लोकांची चाचणी, तात्काळ निदान, योग्य उपचार असे सूत्र अवलंबल्याने जुलै २०२० मध्ये धारावीत कोरोना नियंत्रणात आला.
दिवाळीनिमित्त दादर भागात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. परिणामी, बाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ दिसून येत आहे.
मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सदैव गजबजलेले दादर विभागानेही अनेक उपाययोजनानंतर कोरोनावर मात केली होती. मात्र सध्या या विभागात ८१ सक्रीय रुग्ण आहेत.