गिरीजाबाई पानघाटे यांची पत्रपरिषदेत मागणी
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१:-मनोहर पानघाटे यांचे नाव शेतीच्या दस्तऐवजातून वगळण्यात यावे अशी मागणी त्यांच्या वहिनी व तालुक्यातील चेकबरांज ग्राम पंचायतीच्या सदस्या गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रपरिषदेत केली.गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गोरजा हे आमचे मूळ गाव आहे. याच तालुक्यातील मौजा वनोजा(देवी) येथील भूमापन क्र.१८४, १८८, १८९ व २०९ मध्ये साडे चौदा एकर वडिलोपार्जित शेत जमीन आहे. या शेतजमिनीच्या दस्तऐवजावर वारसान म्हणून इतरांसह मनोहर रामचंद्र पानघाटे आणि मनोहर गोपाळ पानघाटे अशी दोन नावे आहेत. वास्तविक पाहता या दोन्ही नावांची व्यक्ती एकच आहे. मग दोन नावे सात-बारावर कशी ? असा प्रश्नही गिरीजाबाईंनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. मनोहर हे गोपाळ पानघाटे यांचे मूळ पुत्र असून त्यांना त्यांचे मोठे वडील रामचंद्र पानघाटे यांनी सहा महिन्याचे असताना दत्तक घेतले. जि.प.कनिष्ठ प्राथमिक शाळा गोरजाच्या इयत्ता तिसरीच्या शाळा सोडल्याचा प्रमाणपत्रावर मनोहर रामचंद्र पानघाटे असा नामोल्लेख आहे. असे सांगून तसा पुरावाही पत्रपरिषदेत सादर केला. मनोहर हे एकीकडे रामचंद्र पानघाटे यांचे पुत्र म्हणून जि.प.प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर नोकरी करतात.तर दुसरीकडे गोपाळ पानघाटे यांचे पुत्र म्हणून शेतीच्या हिश्श्यावर अधिकार गाजवतात. हे कसे काय योग्य आहे? असाही सवाल गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला.एक तर मनोहर पानघाटे यांनी नोकरी सोडावी किंवा शेती वरील हक्क सोडावा. असा सल्लाही गिरीजाबाईंनी पत्रपरिषदेतून दिला. एक व्यक्ती दोन नावे कसे काय चालवू शकते ? असा प्रश्न उपस्थित करून इतर वारसानांना दाखले मिळण्याकरिता त्रास होत असल्याचे गिरीजाबाईंनी यावेळी सांगितले. तसेच याबाबतीत मारेगाव न्यायालयात एक महिन्यापूर्वी खटला दाखल केला असल्याचे सांगितले. शिक्षण उपसंचालक नागपूर, शिक्षणाधिकारी चंद्रपूर, संवर्ग विकास अधिकारी वरोरा यांच्याकडे आपण तक्रार केली असल्याचेही गिरीजा बाई पानघाटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.पत्रपरिषदेला गिरीजाबाई यांचा मुलगा त्र्यंबक पानघाटे उपस्थित होता. दरम्यान याबाबत मनोहर पानघाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण दत्तक गेलोच नसून आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. मला दत्तक घेतल्याचे पुरावे देऊन सिद्ध करून दाखवावे असे आवाहनही त्यांनी केले.


