विक्रमानंतर लाल किल्ल्यावर फडकला सर्वात मोठा राष्ट्रध्वज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाला वेठीस धरून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारताने लसीकरणाच्या आकड्याचा १०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. हा क्षण ‘उल्लेखनीय यश’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा क्षण सरकारकडूनही साजरा केला गेला. त्यानिमित्त लाल किल्ल्यावर सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावत या क्षणाला ऐतिहासिक महत्त्वही देण्यात आले. या तिरंग्याची लांबी २२५ फूट आणि रुंदी १५० फूट आहे. या राष्ट्रध्वजाचे वजन १४०० किलो आहे.
हाच तिरंगा २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्तानं लेहमध्ये फडकावण्यात आला होता. तसेच हा टप्पा पूर्ण होताच लाऊड स्पीकर्सद्वारे विमान, जहाज, मेट्रो, रेल्वे, बस स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणी याबद्दल उद्घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे इतक्या जलद गतीने लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. हा क्षण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या धामधुमीत साजरा केला गेला.
दिल्लीत पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एम्स नवी दिल्लीच्या झज्जर परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत इन्फोसिस फाऊंडेशनच्या विश्राम सदनाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ‘आजच्या दिवसाची इतिहासात नोंद झाली आहे. भारताने लसीचे १०० कोटी डोस देण्याचा आकडा ओलांडला आहे.
गेल्या १०० वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी दोन हात करण्यासाठी आता देशाकडे १०० कोटी लसीच्या डोसचे मजबूत सुरक्षा कवच आहे. भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे’, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले.आज आपण देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक मेडिकल कॉलेज उभारण्यावर भर देत आहोत आणि त्यात खासगी क्षेत्राची भूमिकाही महत्त्वाची आहे, असेही यावेळी पंतप्रधानांनी नमुद केले. ‘आपण १३० कोटी भारतीय आज भारतीय विज्ञान, उद्योग आणि सामूहिक भावनेचा विजय पाहत आहोत. लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी भारताचे अभिनंदन. डॉक्टर, नर्सेस आणि हा टप्पा गाठण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार’, असे ट्विटही पंतप्रधानांनी केले आहे.
या विश्वविक्रमी क्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात आले आणि त्यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यासोबतच देशातील सर्व रेल्वे स्टेशन, बस स्थानके, राज्याराज्यांमधील सार्वजनिक ठिकाणीही १०० कोटींचे डोस पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही देशाला लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ‘दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाचे हे फळ असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ‘कोविन’ या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत लसीकरणाने एकूण ९९.७ कोटींचा टप्पा गाठला होता. त्यामध्ये जवळपास ७५ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे तर जवळपास ३१ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस प्राप्त केले आहेत.