पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा तालुक्यातील शेती ही दुष्काळ पट्यातील आहे. दरवर्षी पाऊस पिकाला लागेल तेवढाच पडतो. हासेगाव परिसरात पाऊस लांबणीवर पडल्याने खरीप हंगामात पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.पुरेसा पाऊस नसणारे पशूंच्या चा-याचा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकावर प्रादुर्भाव होत आहे. आता उन्हाचा चटका या कोवळ्या पिकांना बसू लागला आहे.
औसा तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके सुकू लागली. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही भागात मध्यम पाऊस झाला असला तरी अन्य भाग अद्याप कोरडा आहे. पावसाने ताण दिल्याने हातातोंडाशी आलेला घास जातो की, काय याची भीती हासेगाव , हिप्परसोगा व गोन्द्री परिसरातील शेतक-यांतून व्यक्त होत आहे. प्रारंभी झालेल्या पावसावर शेतक-यांंनी सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग यांची पेरणी केली. सुरुवातील पेरणी व पिकायोग्य पाऊस झाल्याने पिके जोमात आली. मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने ती सुकू लागली आहेत.पाऊस होत नसल्याने, शेतात भेगा पडत आहेत. नदी नाले कोरडेठाक आहेत. सध्या सोयाबीन पीक हे फुलाच्या अवस्थेत असल्याने पावसाची अत्यंत गरज आहे परंतु आता पावसाअभावी पिके सुकून जाऊ लागली आहेत.
त्यामुळे फुले गळून जात आहेत. हासेगाव परिसरात खरिपाची पिके चांगली असून पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. येत्या काही दिवसात पाऊस जर नाही आला तर सोयाबीन हे पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन पीक जोमात आले आहे. फुलाच्या अवस्थेत असल्यामुळे आत्तापर्यंत सर्वच पिके जोमात आहेत. शेतक-यांनी शेतीला भरपूर पैसा लावला आहें. मशागत केली आहें. सध्या सोयाबीनवर शेंडे अळीचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतक-यांंनी किटकनाशकच्या एक-दोन फवारण्या केल्या असून अधिक पैसा शेतक-यांनी गुंतवला आहे. परिसरातील हासेगावसह गोन्द्री ,हिप्परसोगा, बोरगाव, शिवली, अंदोरा, काळमाथा, कोरगंळा, कवठा केज,नाव्होली, ,भादा , लखनगाव आदी भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने पिके सुकत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. येरे येरे पावसा शेतकरी म्हणत हाक मारत आहेत