मकरंद जाधव तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील युवकांसाठी बोर्ली पंचतन येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालयात रविवार दि.२३ मार्च रोजी मोफत पोलिस आणि सैन्य भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं.आशिर्वाद फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत मुंबईतील करिअर अकॅडमीचे संचालक अशोक बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं.ऑनलाईन फॉर्म भरण्याचं प्रशिक्षण, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक चाचणी (मैदानी) तयारी याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आल्याने देशसेवा आणि समाजसेवेबरोबरच उज्वल करिअर घडविण्याची सुवर्णसंधी इच्छुक उमेदवारांना प्राप्त होणार आहे.आपल्या विभागात वेगाने विकसित होत असलेल्या दिघी पोर्ट सारख्या कंपनीमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी स्थानिक युवकांसाठी कशा उपयोगी ठरु शकतात याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या भागातील मुलांना आगामी संधींबाबत जागरुक करणे आणि त्यांच्या क्षमतांनुसार वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांना योग्य प्रकारे तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं आशिर्वाद फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांनी सांगितलं.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री मोहनलाल सोनी विद्यालयाचे निवृत्त शिक्षक संदीप पाटील व लिलाधर खोत, करिअर अकॅडमीचे संचालक अशोक बाबर आणि त्यांचे सहकारी त्याचबरोबर आशीर्वाद फाउंडेशनचे सदस्य निखिल रिळकर, अमित सावंत,मयूर कविलकर,कपिल सूर्यवंशी,परेश मोहिते, नितेश मोरे,राकेश तोडणकर, अमेय नाझरे आणि निशांत रिळकर यांचं लाभलेल्या सहकार्याबद्दल राजेश चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अमित पाटील यांनी केलं.याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे विविध पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पालक उपस्थित होते.


