शेख शमशोद्यिन तालुका प्रतिनिधी मुदखेड
मुदखेड – तालुक्यातील माळकौठा शिवारात २१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरण ठार झाल्याची घटना घडली. उन्हाळ्याच्या दिवसात वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना त्यांना संरक्षण मिळावे, या हेतूने वनविभागाने पाणीवाटप किंवा अन्य व्यवस्थेची योग्य योजना तयार केली नाही. त्यामुळे जंगलातील प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे.हरण आपली उपजीविका भागवण्यासाठी जंगलातून भटकंती करत असताना अचानक मुख्य रस्त्यावर आले आणि अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत हरणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनविभाग आणि प्रशासनाला या घटनेची माहिती सायंकाळपर्यंत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.याबाबत वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त करत संबंधित वाहन किंवा चालकाचा शोध घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे वन्यजीवांच्या जीवनाला धोका आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाणीवाटपाची व्यवस्था करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, पण मुदखेड तालुक्यात याबाबत कोणतीही ठोस योजना लागू केली गेली नाही. या घटनेने वनविभागाच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम वन्यजीवांच्या सुरक्षेवर झाला आहे.


