शेख शमशोद्यिन तालुका प्रतिनिधी मुदखेड
मुदखेड – तालुक्यातील पाथरड रेल्वे ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या रेल्वे अंडरग्राऊंड ब्रिज कामाच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांना वारंवार भयंकर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. हे काम गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडले गेले असून, त्यामुळे गावातील रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा जीवनक्रम विस्कळित झाला असून, सर्वसामान्य लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून 2022 मध्ये या प्रश्नाकरिता आमरण उपोषणास प्रारंभ करून देखील सदर प्रश्नांची सोडवणूक अद्यापही शासन स्तरावर न झाल्यामुळे पुन्हा एकदा पाथरड येथील ग्रामपंचायत चे सरपंच कैलास पाटील यांनी सदर काम 31 मार्चपर्यंत सुरू न झाल्यास पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 एप्रिल पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. सरपंच कैलास पाटील यांनी पाथरड रेल्वे गावातील काही शेतकऱ्यांनी अंडरग्राऊंड ब्रिजच्या परिसरात पाणी सोडल्यामुळे होणाऱ्या मोठ्या समस्यांचे दाखले दिले आहेत. “हे पाणी सोडल्यामुळे ग्रामस्थांचा रहदारी मार्गे बंद होऊन, वर्षानुवर्ष या सार्वजनिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे या बाबीचा गावच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होतो आहे. हे थांबवण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी,” असे सरपंच कैलास पाटील यांनी सांगितले.मान्सून हंगामाची सुरूवात लवकरच होईल, त्यामुळे जून महिन्यापर्यंत काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यापूर्वी काम सुरू न केल्यास, “पावसाच्या धक्क्यामुळे प्रकल्पातील काम अडचणीत येईल आणि गावातील नागरिकांना अधिक त्रास होईल,” असेही सरपंच कैलास पाटील यांनी स्पष्ट केले दरम्यान व उपसरपंच जयवंतराव थोरात यांनी सरपंचांच्या या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला असून ते देखील या उपोषणात सहभागी होणार आहेत.


