मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली: चामोर्शी
तालुक्यात आष्टी शहराचा परिसर लोकसंख्येने व विस्ताराने बराच मोठा आहे. राजकीय दृष्ट्याही आष्टी शहर परिसराला फार महत्व दिले जाते. परिसरात मार्कंडा कंन्सोबा, ईल्लूर, कुनघाडा, ठाकरी, रामनगट्टा, अनखोडा,चंदनखेडी, खर्डी आदी गावांचा समावेश आहे. चपराळा व वन्यजीव अभयारण्य जंगलाला लागून आहेत . वन्यजीव अभयारण्यातील जंगलात जाण्यास वनविभागाने बंदी घातल्याने तेथील नागरिक जंगलात जाऊन जळाऊ लाकडे आणू शकत नसल्याने दैनंदिन वापरासाठी जळाऊ लाकडांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक वनविभागाने परिसरातील जंगल लगतच्या गावांना राशन कार्डवर जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. जंगलाची तोड कमी करून निसर्गातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी शासनाने घर तिथे गॅस सिलेंडर योजना आखली आहे. मात्र गॅस सिलिंडरच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी गॅसचा वापर करणे बंद केले आहे. काही अज्ञात नागरिकांना गॅसच समजत नसून, लाकडे पेटवून चुलीवरच्या स्वयंपाकाची सवय असल्याने त्यांच्या गॅस वापरातून बाद झाल्या आहेत. आंघोळीसाठी पाणी गरम करणे, संयुक्त व मोठ्या कुटुंबाचे स्वयंपाक तयार करणे, हिवाळ्याच्या दिवसांत शेकोटी पेटवने, खरीप हंगामाच्या दिवसात मजुरांसाठी मोठा स्वयंपाक शिजवणे आदी दैनंदिन वापरासाठी सर्वसामान्य नागरिकांना महागड्या गॅसच्या ठिकाणी जळाऊ लाकडांची फार गरज आहे . विशेष म्हणजे हिंदू परंपरेनुसार मृत व्यक्तीचे अंत्यदाह करण्यासाठी जळाऊ लाकडांची अत्यंत गरज असते. मात्र स्थानिक ठिकाणी जळाऊ लाकडे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना धावपळ करत बाहेर ठिकाणावरून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करून लाकडे गोळा करावी लागत आहेत.
आष्टी शहराजवळील मार्कंडा (कंन्सोबा) येथे वनविभाग (प्रादेशिक) कार्यालय, वनविकास महामंडळ कार्यालय, चपराळा वन्यजीव अभयारण्याचे वनपाल कार्यालय असे तीन वनविभागाचे कार्यालय आहेत. मात्र एकाही ठिकाणी जळाऊ लाकूड उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासनाने तसेच नुकतेच निवडून आलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ डॉ. मिलिंद नरोटे यांनी गांभीर्याने लक्ष घालवून आष्टी परिसरातील अभयारण्य जंगलाला लागून असलेल्या गावांना जळाऊ लाकडे बिट उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा अशी मागणी माजी ग्रा प सदस्य भास्कर फरकडे यांनी केली आहे.