पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: गौताळा अभयारण्याच्या पाटणादेवी,अंबाला,ठाकूरवाडी भागात शनिवारी 31 रोजी चंदन लाकडाची चोरी करणारे तस्कर मुद्देमाल टाकून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची घटना शनिवारी 31 जुलै रोजी घडली.वन्यजीव विभागाने मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवार रोजी रात्री गौताळा अभयारण्याच्या पाटणादेवी,अंबाला,ठाकुरवाडी भागात काही अज्ञात चोरटे चंदनाची ताज्या तोडीची लाकडे घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.तात्काळ शनिवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास वन्यजीव विभागाचे सहाय्यक वन्यजीव वनसंरक्षक (कन्नड) आशा चव्हाण वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी(नागद)सागर ढोले,वनपाल एस आर मोरे ,के.बी.रायसिंग,वनरक्षक दांडगे,लटपटे,समाधान पाटील,राम डुकरे,अनिल चव्हाण,सोनार,चांदवडे,कल्याण खोकट काकरवाल,अजय मेहर,हरीश उप्पलवाड,व इतर वनमजुर यांनी सापळा रचून रात्री तिनच्या सुमारास चंदन तस्कर मुद्देमाल घेऊन डोंगर चढत असतांना त्याचा पाठलाग सुरू केला.मात्र आधाराचा गैरफायदा घेत तस्कर सोबतच्या पिशव्या व मुद्देमाल तेथेच टाकून अंधारात पसार झाले.दरम्यान सदरील पिशव्यातुन ताज्या तोडीचे चंदन लाकडे अर्धा ते दोन फूट लांबीच्या आकाराचे चंदनाचे 100 नग एकूण वजन 11.600 किलोग्रॅम दोन वायरच्या पिशव्या ,तीन लहान करवत,दोन कुऱ्हाडी,एक टॉमी,एक कानस,एक गुलेर असा मुद्देमाल वन्यजीव विभागाने जप्त केला.सदरील करवाही विभागीय वन अधिकारी विजय सातपुते व मानद वन्यजीव संरक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदरील प्रकरणात फरार आरोपीविरुद्ध वणगुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास कन्नड वन्यजीव सहाय्यक वन संरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनोज उदार हे करत आहे.