महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि. 30:’नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात आली असून भद्रावती तालुक्यातील शेकडो हातांना काम मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजप-सेना युती शासनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारु विक्रीला मोठे उधान आले होते. लहान-मोठे झटपट पैसा कमाविण्याच्या नादात अवैध दारु विक्रीकडे वळले होते. पोलिस यंत्रणेवरही मोठा ताण आला होता. देशी दारुची दुकाने आणि बिअर बार मध्ये काम करणा-या कामगारांचे संसार उघड्यावर पडले होते. दारु व्यवसायावर अवलंबून असलेले इतर व्यवसाय डबघाईस आल्याने अनेक जण बेरोजगार झाले होते. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. बाजारपेठेतही उदासिनता आली होती.मात्र आता दारुबंदी उठल्याने दारु व्यवसायाशी संबंधित सर्व लोकांच्या चेह-यावर हास्य फुलले आहे. अधिकृत दारु दुकाने व बार सुरु झाल्याने लपत-छपत दारु पिणा-यांची संख्या रोडावली असून बारमधील गर्दी वाढली आहे.तर अवैध दारु विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. मद्यशौकीन बारमध्ये येऊन मद्य प्राशन करीत असल्याने बारमालकांना अवैधरित्या मद्य विक्री करण्याला वावच मिळत नाही.