सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हिवरा आश्रम :गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून शिक्षणाच महत्व पटवून देतांना सांगत,, बाबहो लेकरांना शिकवा. भले तर कर्ज काढा,, पण लेकरांना शिक्षणापासून वंचीत ठेवू नका..
अर्थात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी आपण आटापिटा करतो.परंतु नियतीने ज्यांच्या डोक्यावरच मातृ पितृ छत्र हिरावून नेलं,, त्या लेकरांच्या शिक्षणाच काय?? त्यांच्या सांगोपनाच काय? त्यांच्या बालपणीच्या लाडाच,, हट्टाच,आवडी निवडीचं काय??? अशी अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. परंतु ह्या सर्व प्रश्नांची कृतिशील उत्तरे देऊन गेल्या अकरा वर्षांपासून 30 वंचीत मुलांचा पालक बनून त्त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं सेवाकार्य हिवरा आश्रम येथील अनंता शेळके नावाचा एक ध्येयवेडा शिक्षक गेल्या अकरा वर्षांपासून करीत आहे. ह्या लेकरांच्या संगोपनासाठी आपल्या नोकरीच्या पगारावर कर्ज काढून त्यांना हक्काचं घर थाटत सामाजिक बांधिलकीचा सुवर्णं अध्याय अधोरेखित केला आहे. भाड्याच्या खोलीत सुरु केलेलं हे सेवाकार्य बघता बघता 3000 चौ फुटाच्या दुमजली इमारतीत विस्तारलं आहे. अनंता शेळके यांनी स्वनिधीतून सुरु केलेल्या या सेवाकार्यात समाजाच्या विविध स्तरातील दत्त्रुवसंपन्न लोक उस्फुर्तपणे सहकार्य करत आहेत….
जे स्वतः भोगलं,,,, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये,,,,,म्हणून कार्यास प्रारंभ ..
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मेरिटचे गुण असताना देखील केवळ आर्थिक सहकार्य न मिळाल्यामुळे उच्च शिक्षण पूर्णं करण्याच स्वप्न अपूर्ण राहील. त्यामुळे मोलमजुरी करून कसेबसे शिक्षण पूर्णं केले. परिस्थितीत आयुष्य होळपरून गेलं,,, परंतु जे आपण भोगलं,, ते इतर वंचीत मुलाच्या वाट्याला येऊ नये,, त्यासाठी आपण काहीतरी ह्या समाजाचे देणे लागतो,,, ह्याच भावनेतून ह्या कार्याचा प्रारंभ करण्यात आला.
” शिवभावे जिवसेवा”
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदाच्या दिव्य विचारांना कृतीरूप देण्याचा अल्पसा प्रयत्न नित्यानंद सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून अकरा वर्षांपासून होत आहे.
ब्रह्मचारी सुनील महाराज गांगलगाव व ब्रह्मचारी किशोर महाराज डव्हा यांच्या प्रेरणेने जि प शिक्षक अनंत शेळके यांनी हा प्रकल्प सुरू केला.
भाड्याच्या खोलीत प्रकल्पाला सुरुवात
अनंत शेळके यांनी भाड्याच्या खोलीत दिनांक 15 मार्च 2009 रोजी 5 गरजू मुलं दत्तक घेऊन या निरपेक्ष सेवा कार्याला सुरुवात केली. अनंत शेळके स्वतः मुलांच्या मदतीने स्वयंपाक करून या विद्यार्थ्यांना खाऊ घालत असत. दोन वर्षानंतर प्रकल्पाचे स्थलांतर राहत्या घरी केले.
राहत्या घरी सुसज्ज घरात प्रकल्पाचे स्थलांतरण
राहत्या घरी स्वतःच्या घराला लागून एक ध्यान केंद्र सुसज्ज निवास किचन इत्यादी सर्व सुविधांनीयुक्त प्रकल्प थाटल्या गेला. पाच मुलांवरून संख्या पंधरा मुलांपर्यंत पोहोचली परंतु गरजू मुलांची संख्या लक्षात घेता जागा कमी पडल्याने दहा हजार स्क्वेअर फूट भूखंड गावाबाहेर चिखली मेहकर हायवेवर विकत घेऊन स्वतः अनंत शेळके यांनी बांधकाम सुद्धा स्वनिधीतून केले.
प्रकल्पाचे स्थलांतर
2017 साली प्रकल्पाचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले सुमारे 3000 स्क्वेअर फूट बांधकामाची दोन मजली इमारत वंचितांचा संचित घडवत आहे. सध्या स्थितीत 30 मुले तिथे निवासास असून निवास भोजन, ट्युशन, सर्व सुविधांचा आनंद घेत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
43 विद्यार्थी शासकीय सेवेत
अकरा वर्षाच्या या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या नित्यानंद परिवाराच्या सानिध्यात घडलेली 43 विद्यार्थी शासकीय सेवेत असून तेच विद्यार्थी आता या सेवा कार्यात आपल्या समिधा अर्पण करून हा सेवा यज्ञ प्रदिपत ठेवत आहेत उर्वरित विद्यार्थी उत्तम माणूस म्हणून समाजात वावरत आहेत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दानशूर दाते देखील स्वयंप्रेरणेने या सत्कार्याला सहृदयतेने बळ देत आहेत..
भविष्यातील महत्वकांक्षी योजना….
[1]सुसज्ज डिजिटल अभ्यासिका
[2]स्वतंत्र स्वच्छालय व स्नानगृह
[3]संगणक लॅब
[4]तिसऱ्या मजल्याचे बांधकाम
[5]स्वतंत्र डायनिंग हॉल
[6]हेल्थ क्लब
[7]संगीत कक्ष
[8]डिजिटल क्लासरूम
शाखा: (1) गावातील शाखा दहा मुलांची निवास व्यवस्था
(2)नूतन शाखा 30 मुलांची निवास क्षमता असलेल्या वंचितांसाठी हक्काचं घर थाटणारे अवलिया शिक्षक अनंता शेळके आहे.











