पुष्पा चित्रपटाला साजेशी तस्करीवन विभागाकडून पहिल्यांदा ड्रोनचा वापर
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 09: तालुक्यातील वन विभागाच्या राणीपूर परिक्षेेेत्रातील ताेरणमाळ येथे वन विभागाने माेठी कारवाई करीत सुमारे ११ लाख रुपयांचे सागवानी लाकूड जप्त केले. विशेष म्हणजे पुष्पा चित्रपटालासाजेशी घटना यावेळी दिसून आली. लाकूड तस्करांनी हे संपूर्ण लाकूड जमिनीत पुरून ठेवले हाेते. कारवाई वेळी चक्क जेसीबीच्या मदतीने हे लाकूड बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शहादा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंखे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी याची पडताळणीचे करण्याचे आदेश राणीपूरचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांना दिले. श्री. चव्हाण यांनी माहिती खरी असल्याचे वरिष्ठ कार्यालयास कळविले. त्यानुसार शहाद्याचे वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे, धडगावच्या वनक्षेत्रपाल श्री. काटे, वनक्षेत्रपाल श्री. रणदिवे तसेच वनपाल, वनरक्षक, गार्ड, मजूर यांनी सुमारे २० गाड्यांचा ताफा घेऊन जात तोरणमाळ जंगलातील कोटबांधणी परिसरात धाड टाकली. त्या कारवाईत सुमारे ११ लाख रुपयांचे ८ मीटरच्या सागवानी लाकडाच्या ३१० दांड्या, आकारमान साडेपाच घनमीटर व तुटीचे सागवानी गोल दोन घनमीटर अशा मुद्देमालाचा समावेश आहे. तस्करांनी लाकूड थेट जमिनीत पुरून ठेवल्याचे समोर आले. त्यामुळे चक्क जेसीबीच्या सहाय्याने जमिनीत लपवून ठेवलेले लाकूड बाहेर काढण्यात येऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुष्पा चित्रपटाला साजेशी लाकडांची तस्करी येथील जंगलात सर्रास सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस जंगलातील सागवान, खैर अशा माैल्यवान झाडांची कमी झालेली संख्या पाहून वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. यात मिळालेल्या माहितीनुसार तिची पडताळणी करून अद्यावत साधनांचा वापर करून तस्करांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई करताना अद्यावत ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यातून परिसरात तस्करांना जंगल भागातून लाकूड कापण्या संदर्भातच धास्ती निर्माण झाली आहे. ही कारवाई माहिती मिळाल्यापासून केवळ चार ते पाच तासांच्या कालावधीत करण्यात आली. कोणीही बेकायदा जंगलात जाऊन वृक्षतोड किंवा अतिक्रमण केल्याबाबत वन विभाग माहिती मिळाल्यानंतर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून त्याबाबत त्या भागातील स्थानिक नागरिकांना सूचना दिल्या आहेत अशी माहिती राणीपूरचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांनी यावेळी दिली.


