विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर :’भारतातील वैभवशाली भूप्रदेश ‘ या संकल्पनेवर आधारित विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल ,चिंचोलीचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात व जल्लोषात पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानच्या चिंचोली येथील नवीन संकुलात प्रथमच पार पडला.याप्रसंगी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच तालुका पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकावणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा देखील बक्षीस पत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दौंड तालुक्याचे डी.वाय.एस.पी स्वप्निल जाधव उपस्थित होते.विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या प्रमुख विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.या प्रसंगी विद्या प्रतिष्ठान संस्थेचे रजिस्ट्रार श्रीष कुंभोज सर,विश्वस्त किरण गुजर हे देखील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जसजशी कार्यक्रमाची वेळ जवळ येऊ लागली तसतसे आकर्षक वेशभूषेतील चिमुरडे वेगवेगळ्या राज्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी या ठिकाणी जमा होऊ लागले आणि सर्व उपस्थितांच्या मनात हा प्रश्न पडला की ,आता भारतातील कोणकोणत्या राज्यांची सफर आपल्याला घडणार आहे.मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व बक्षीस वितरण समारंभ पार पडल्यानंतर कार्यक्रमास संगीत जुगलबंदीने सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी तबला, हार्मोनियम,सिंथेसायझर,ट्रिपल काँगो ,ऑक्टो पॅड अशा विविध वाद्यांच्या साह्याने संगीत शिक्षक रजनीकांत भोसले यांच्या मदतीने सांगितीक जुगलबंदी सादर केली.
गणेश वंदनेने विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कारास प्रारंभ झाला.जम्मू काश्मीर, पंजाब, , उत्तराखंड ,मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश , बिहार , गुजरात ,राजस्थान ,गोवा, आसाम पश्चिम बंगाल व केरळ अशा विविध राज्यांचा इतिहास, संस्कृती ,परंपरा विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. प्री- प्रायमरीतील चिमुरड्यांनी महाराष्ट्रातील विविध सण ,उत्सवांचे सादरीकरण नृत्याद्वारे केले.या वार्षिक स्नेहसंमेलनाचा आरंभ जितक्या उत्साहात झाला तितक्याच दमदार पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती ,परंपरा व विविध लोककलांचे सादरीकरण करत समारोप देखील झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला अडेपल्ली यांनी केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख सोनाली ढवळे व सोनम गवळी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले. आभार प्रदर्शन क्रांती गायकवाड यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.


