बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी पुरंदर (सासवड)
गुरुवार दि.२१ /१२/२०२३ रोजी म.ए.सो.वाघीरे विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसम्मेलनांतर्गत पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश युवा उद्योजक आघाडीचे अध्यक्ष आणि शेवॉन-निसू रेडिएटर्स कंपनीचे संचालक श्री.मंगेश केंद्रे हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. शेवॉन निसू रेडिएटर्स कडून CSR फंडांतर्गत विद्यालयाला सुमारे २० लक्ष रुपये किमतीचे आठ स्मार्ट बोर्डस् भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाघीरे संकुलाचे शाला समिती अध्यक्ष ॲड.श्री.सागर नेवसे यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.दत्ताराम रामदासी यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यालयाने शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मिळविलेल्या उत्तुंग यशाचा आढावा घेतला.
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.शंतनू सुरवसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
आपल्या संबोधनामध्ये प्रमुख अतिथी श्री.केंद्रे यांनी अभ्यासामधले सातत्य आणि उत्तम शरीरसंपदा यांच्या जोरावर सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थीही उत्तम यश मिळवून जीवनात यशस्वी होऊ शकतो असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. ॲड.श्री.नेवसे यांनीही उत्तम यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर शैक्षणिक , सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी शैक्षणिक पारितोषिकांचे वाचन सौ.संगीता रिकामे यांनी तर क्रीडा पारितोषिकांचे वाचन श्री.भाऊराव खुणे आणि श्री. हिरामण सहारे या शिक्षकांनी केले.
विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.शुभांगी कांबळे,म.ए.सो. बालविकास मंदिर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडधे ,पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.सारिका बधे, स्नेहसम्मेलनाचे क्रीडा अध्यक्ष श्री.गणेश खळदकर, शिक्षकेतर प्रतिनिधी सौ.शारदा सोळंके विद्यार्थी प्रतिनिधी कु.दिया यादव, कु.अपेक्षा सूर्यवंशी, कु.सायली झुरंगे हे सर्वजण कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री. शिवहार लहाने यांनी केले. स्नेहसम्मेलनाच्या कार्याध्यक्षा सौ.संगीता रामदासी यांनी आभारप्रदर्शन केले.











