बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी पुरंदर (सासवड)
टाळ – मृदुंगाचा अखंड जयघोष, हरिनामाचा जागर, कीर्तन, प्रवचन, हरिजागर, गाथा पारायण वाचन त्याचप्रमाणे डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून संपूर्ण गावातून काढलेली पालखी प्रदक्षिणा, रस्त्यावर ठीक ठिकाणी रांगोळी, फुलांचा सडा, शेकडो ग्रामस्थांच्या फोडलेली दहीहंडी आणि काल्याच्या महाप्रसादाने सुरु असलेल्या ४१ व्या अखंड हरीनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. दरम्यान श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष राजाराम कुंभारकर यांच्या माध्यमातून प्रत्येक कीर्तनकारांना भैरवनाथ प्रतिष्ठानचे वतीने स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
वनपुरी ( ता. पुरंदर ) सालाबादप्रमाणे ४१ व्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि. १३ रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत कलश पूजन आणि वीणा पूजन करून सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण सप्ताहात हभप चैतन्य शिंदे, अर्पिता अमराळे, भोर तालुक्यातील शिंद येथील गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक उमेश शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार कबीर आतार, गणेश फरताळे, आकाश कामठे यांची कीर्तन सेवा झाली. तर माऊली चाळक आणि कृष्णा चाळक या बंधूनी जुगलबंदी सादर केली.
मंगळवार १९ रोजी दुपारी ४ ते ६ ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची फुलांनी सजविलेल्या पालखीतून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी महिलांनी रांगोळी तसेच फुलांनी संपूर्ण रस्ता सजविला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. तसेच रात्री हभप आकाश कामठे यांचे कीर्तन झाल्यानंतर शेकडो मेणबत्त्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तर बुधवारी २० रोजी हभप कांता महाराज चोरघे यांचे काल्याचे कीर्तन होवून दहीहंडी फोडण्यात आली. तसेच उपस्थितांना महाप्रसाद देवून अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.
श्रीविठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन केले होते. यावेळी माजी सरपंच एकनाथ कुंभारकर, रामदास कुंभारकर, शामराव कुंभारकर, नामदेव कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, सरपंच राजश्री कुंभारकर, वर्षाताई कुंभारकर, श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुंभारकर, मुख्याध्यापक माणिक कुंभारकर,सोसायटी चेअरमन सुनील कुंभारकर, शांताराम कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर, भजनी मंडळाचे महादेव कुंभारकर, तुकाराम महामुनी, भिमाजी कुंभारकर, देवराम जगताप, संभाजी महामुनी, माणिक कुंभारकर, सुरेश महामुनी, नामदेव मगर, मंदिराचे पुजारी दामोदर रूढ, गणेश रूढ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ ;वनपुरी ( ता.पुरंदर ) येथे अखंड हरीनाम साप्ताह निमित्त ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली