अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे अंतर्गत गुणवत्ता हमी विभागामार्फत "नविन शैक्षणिक धोरण-२०२०" या विषयावर चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नविन शैक्षणिक धोरणाला सत्र २०२३-२४ पासून पदव्युत्तर विभागासाठी सुरुवात केली असून येत्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवीच्या सर्व वर्गांना नविन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील नॅकचे समन्वयक प्रा शशिकांत सिरसाट होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ विजय मोरे व हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ गजानन वानखडे व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ नितीन जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख डॉ महादेव रिठे यांनी केले. डॉ विजय मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये नविन शैक्षणिक धोरणामध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्माण करण्याचे दिशानिर्देश दिलेले असून आपल्या विद्यापीठाने सुद्धा त्यानुसार अभ्यासक्रमाचे नियोजन केल्याचे स्पष्ट केले. डॉ गजानन वानखडे यांनी अभ्यास मंडळातील झालेल्या चर्चा व नवीन शैक्षणिक धोरणातील धोरणात्मक बाबी याबाबत ची माहिती उपस्थितांना दिली. प्रा शशिकांत सिरसाट यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात चर्चासत्रातील सर्व बाबींचा आढावा घेत येणाऱ्या शैक्षणिक धोरणासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांनी सज्ज रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चर्चासत्रांमध्ये डॉ गोविंद गायकी, डॉ भगवान गरूडे, डॉ स्वप्निल दांदडे, प्रा दिपक लहासे, डॉ कामिनी मामर्डे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा दिपक लहासे यांनी केले.