प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा:-
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आज अक्कलकुवा तहसिलदार रामजी राठोड यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले कि , अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाळ येथील विजपुरवठा मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसापासून नेहमी वीजपुरवठा खंडित असतो. चुकून एखादे वेळी वीजपुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडित होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात बिघाड होत आहे. पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने पीठ गिरणी बंद राहते, त्यामुळे महिला वर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. घरची कामे मजुरी व शेतीची कामे सोडून धान्य दळून आणण्यासाठी पीठ गिरणीवर चकरा माराव्या लागतात तसेच आजच्या काळात सर्व दाखले हे ऑनलाईन पद्धतीने मिळतात. मात्र वीजपुरवठा खंडित राहत असल्याने प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा विपरित परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, बोरवेलचे मीटर कॉम्प्युटरमध्ये बिघाड येत आहे. परिसरातील नागरिकाना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी वाट पाहणे नित्य नियमाचा खेळ झाला आहे. नागरिकानी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. तक्रारीची दखल जर घेतली तर, तात्पुरती दुरस्ती केली जात असल्याने नागरिक वैतागले आहेत.
सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक मेटाकुटीला आले असून यापासून महावितरण कधी सुटका करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोलवीमाळ गावातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोलवीमाळ, देवपाडा,बोडीपाडा, केलीपाडा आदी परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. व या निवेदनाची दखल न घेतल्यास दिनांक : २१ /१२ /२०२३ रोजीपासून अक्कलकुवा – बऱ्हाणपुर राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास विज महामंडळ जबाबदार राहील याची सक्त नोंद घेण्यात यावी.अश्या आशयाचे निवेदन अक्कलकुवा तहसिलदार रामजी राठोड यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अली महंमद मक्राणी,अक्कलकुवा –धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड. रुपसिंग वसावे, तालुकाध्यक्ष गजानन वसावे,ज्येष्ठ कार्यकर्ते राणुलाल जैन,युवक तालुकाध्यक्ष सागर वळवी, आधी कार्यकर्ते उपस्थित होती.











