दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : जव्हार शहराला चार दशलक्ष घनमीटर प्रतिदिन पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणारी खडखळ नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन वर्षापासून ठेकेदाराच्या व जव्हार नगरपालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे रखडली आहे. नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत सुमारे 18 कोटी रुपये खर्च करून खडखड नळ पाणीपुरवठा योजनेचा ठेका 2019 मध्ये आर. ए. घुले या ठेकेदाराला मिळाला. मात्र ठेकेदाराने सदर काम मुदतीत पूर्ण केले नाही. चार वेळा या कामाची मुदतवाढ या ठेकेदाराला देण्यात आली. जेव्हा ठेकेदाराच्या मनात येते तेव्हा तो काम सुरू करतो हे काम करत असताना कोणते नियोजन, मोजमाप न करता मनमानी पद्धतीने काम केले जात आहे. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा इंजिनियर या ठिकाणी फिरकत नसल्यामुळे, अत्यंत निकृष्ट पद्धतीने हे काम सुरू आहे. पाईप टाकण्यासाठी ठेकेदाराने जव्हार शहरातील नवीन डांबरीकरणाचे रस्ते जेसीबी च्या साह्याने खोदल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. वास्तविक पाहिलं पाईप टाकण्यासाठी खोदाई रस्त्याच्या कडेला माप घेऊन करने गरजेचे होते, परंतु तसे न करता अडजोड पद्धतीने हे रस्ते खोदल्यामुळे सहा महिन्यापूर्वी केलेले नवीन रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. तसेच खोदलेले खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याने उंचवटे तयार होऊन मोटरसायकलचे अपघात होत आहेत, तर संपूर्ण रस्त्यावर माती पसरुन धुळीचे साम्राज्य पसरले आहे. एकंदरीत पाहिलं तर नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराकडून संपूर्ण जव्हार शहराला वेठीला धरले जात आहे. विशेष म्हणजे ही नळ पाणीपुरवठा योजना ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे सपशेल अपयशी ठरली असून, केवळ ठेकेदाराला उर्वरित कामाचे पैसे काढून देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाची ही धडपड चालू असल्याची चर्चा जव्हार शहरात सुरू आहे.