शिरजगावं केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या काळात शाळा, शिकवणी, मनोरंजनसह खेळ सुध्दा आवश्यक आहे. आताच्या मोबाईलच्या काळात ग्रामीण भागातील मुले मैदानी खेळ खेळतात नव्हे तर या स्पर्धेत जिंकतात ही आनंदाची बाब असल्याचे मत चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या माजी उपसभापती प्रतिभाताई डांगे यांनी व्यक्त केले. मांजरखेड कसबा व शिरजगावं कोरडे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद पू.मा.शाळा चिरोडी येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य अमोल होले यांनी केले.दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळा चिरोडी येथे करण्यात आले तर क्रीडा स्पर्धा शासकीय आश्रमशाळा चिरोडी येथील प्रांगणात घेण्यात आल्या. पंचायत समिती सदस्य अमोल होले यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अध्यक्षपदी पंचायत समिती सदस्या प्रतिभाताई डांगे ह्या होत्या. यावेळी चिरोडीचे सरपंच संदीप कूमरे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय राठोड, सुरेश राठोड, श्रीचंद जाधव, श्री राऊत, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण पाटील, गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ श्रीनाथ वानखडे, मांजरखेड केंद्राचे केंद्रप्रमुख केशव राठोड, शिरजगाव कोरडे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश शिंगाणे, जिल्हा परिषद शाळा चिरोडीचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मनोज वांगे आदींची उपस्थिती होती.उद्घाटकिय भाषणातून पंचायत समिती सदस्य अमोल होले यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्षभर नानाविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या व्यस्त वेळापत्रकात शिक्षक व विद्यार्थ्यांची अक्षरशः धावपळ होत असताना विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करणे तारेवरची कसरत आहे. या शिक्षक व विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे मत व्यक्त केले.दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत कब्बडी, खोखो, लंगडी, व्हॉलीबॉल, बॅटमिंटन, पोत्यांची शर्यत ,धावणे, रिंग, आदी संयुक्त व एकल स्पर्धेचा समावेश होता.विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव : दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भव्य दिव्य स्वरूपाचे करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद शाळा मांजरखेड व कारला यांनी गोंधळ,तर चिरोडी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम,गोंडी नृत्य सादर केले. उत्कृष्ठ सादरीकरणासाठी उपस्थित मान्यवरांकडून रोख स्वरूपात बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत उंडे, संचालन ज्योत्स्ना हिरडे तर आभार मुकुंद चरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीना उगले, प्रफुल निचत, भारती माहुरे, कुशल व्यास, किशोर बकाले,अनिल भरोसे, नरेश बनसोड ,संजय हिरुरकरसह शिरजगावं व मांजरखेड केंद्रातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.