उमरखेड येथे आदिवासी संघर्ष परिषद संपन्न
अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
शहीद तंट्या मामा भिल्ल चार डिसेंबर व सोमा डोमा आंध दहा डिसेंबर यांच्या बलिदान दिनानिमित्त बिरसा क्रांती दलाच्या वतीने दिनांक १० डिसेंबर २०२३ रविवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे आदिवासी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.बिरसा क्रांती दलाच्या वतीने आयोजित आदिवासी संघर्ष परिषदेच्या अध्यक्षस्थानी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी हे होते. तर उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाजाचे अधिकारी, पदाधिकारी सोबतच जिल्ह्यातून आलेले बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.दशरथ मडावी यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडली.
आदिवासी समाजावर पूर्वीपासून अन्याय अत्याचारच होत आले आहे आजही तो चालू आहे. जो तो उठतो आणि आदिवासींचे अधिकार आणि हक्क बळकावण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता आदिवासी समाज जागृत झालेला आहे त्याला अन्याय अत्याचाराची जाणीव होत आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आपला आवाज लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद येथे पोहोचण्यासाठी आपली राजकीय शक्ती ओळखली पाहिजे. राजकीय शक्ती शिवाय शासनाला आपल्या आदिवासी समाजाच्या समस्या कळणार नाहीत. आपल्या आदिवासी समाजावर अन्याय अत्याचाराला वाचा फोडली जाणार नाही. यासाठी सर्वांनी पेटून उठलं पाहिजे आणि आपली आदिवासी समाजाची राजकीय शक्ती या शासनाला दाखवून दिली पाहिजे तरच आपल्याला शासन दरबारी न्याय मिळेल. नाहीतर आज पर्यंत आपण कुणाच्यातरी पाठीमागेच फिरत आलो आणि असेच पाठीमागे फिरत राहू. आपल्या आदिवासी समाजाचा असाच उपयोग घेतल्या जाईल. यासाठी सर्वांनी राजकीय शक्ती दाखवण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. जेणेकरून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करण्याची हिम्मत कोणी करणार नाही असे उद्गार अध्यक्षीय भाषणात दशरथ मडावी यांनी मांडले.
चौकट:-
आता आदिवासी समाज जागरूक होत असून त्याला आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याच्याराची जाणीव होत आहे. यामुळे समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी लवकरच राजकीय पक्ष स्थापन होणार असून यातून समाजाच्या समस्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जाईल.









