- आरोग्य शिबीर, पदवी वितरण, ग्रामसफाई असे विविध कार्यक्रम संपन्न
सतीश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
विवेकानंद आश्रमात दरवर्षी संपन्न होणारा गुरूपौर्णिमा उत्सव दि. २३ शुक्रवारी मर्यादीत स्वरूपात, नियमांचे पालन करीत अत्यंत उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला. मानवी जीवन समृध्द करण्यासाठी त्याच्या स्वतत्वाची जाणिव निर्माण करून देण्यासाठी विवेकाच्या प्रदेशात मुल्यांची पेरणी करून मानवी जीवनाला कृतार्थ करण्यासाठी भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी समाजाच्या उत्कर्षासाठी सुरू केलेला विवेकानंद आश्रम हा गुरूप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. गुरू हा केवळ मानवी देहधारी व्यक्ती असतो असे नव्हे तर ते एक अरूप तत्व असते. गुरूंच्या तत्वांचे आचरण हीच खरी श्रेष्ठ पूजा आहे. त्यानिमित्ताने विवेकानंद आश्रमात रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात कोरोना नंतरचे आजार, स्त्रीयांचे आजार, बालरोग निदान, नेत्रतपासणी असे विविध आजारांच्या तपासण्या निःशुल्क करण्यात आल्या.

सकाळी ८ वाजता डॉ.आशिष चांगाडे यांनी रूग्ण तपासणी करून शिबीराला सुरूवात केली. या शिबीरात 212 रूग्णांनी तपासणी करून घेतली. विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण समारंभात ४३ विद्यार्थ्यांना विज्ञान स्नातकाची पदवी वितरण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.डी.पाटील हे होते. सकाळी ६ वाजता हरिहर तीर्थावर भगवान बालाजी व भगवान शिव मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. सकाळी ७ वाजता परिसराची स्वच्छता करून ग्रामसफाई करण्यात आली. ७.३० वाजता हरिहर तीर्थावर महाआरती करण्यात आली. ९ वाजता महाराजश्रींच्या समाधीस्थळावर पूजन करण्यात आले. विवेकानंद स्मारकावरील विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या हस्ते प्रतिमांची विधिवत पूजा करण्यात आली. भाविकांनी आश्रमात गर्दी न करता आपल्या घरी राहूनच गुरूप्रतिमाचे पूजन करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. त्याला भाविकांच्या वतीने प्रतिसाद देण्यात आला.











