गोविंदा राऊत
ब्युरो चिफ गडचिरोली
गडचिरोली: जिल्ह्यातील नक्षल चळवळीत सहभाग असलेल्या जहाल नक्षली महिला ‘नक्षल आत्मसमर्पण योजने’ अंतर्गत आत्मसमर्पण करून सर्वसामान्य जीवन जगण्याचे प्रयत्न करतात. त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. गडचिरोली पोलीस दलासमोर नक्षल चळवळीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या 25 महिलांच्या पुनर्वसना करीता विशेष बाब म्हणून
आरसेटी व जिल्हा पोलीस दलाचा भारतातील प्रथमच पापड, लोणचे, मसाला तयार करण्याचा अभिनव उपक्रम घेण्यात आला. हा 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण दि.14 जुलै ते 23 जुलै पर्यंत गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल (भापोसे) , मनिष कलवानीया (भापोसे) , समीर शेख (भापोसे) , सोमय मुंडे (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिपत्याखालील स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटी गडचिरोली यांच्या माध्यमातून घेण्यात आला. सदर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आत्मसमर्पित नक्षल महिलांना 23 तारखेला प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले .
आत्मसमर्पित नक्षल महिला दैनंदिन अत्यावश्यक गरजांपासून वंचीत राहू नयेत.तसेच त्यांना हक्क – अधिकार, कर्तव्य तसेच व्यवसायातील स्पर्धा याची जाणीव प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून देण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीच पापड, लोणचे बनविलेच नाही अशांनी स्वमर्जीने या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. 10 दिवसाच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिकां वर जास्त भर देऊन केवळ वस्तू उत्पादन न करता त्याची बाजारात विक्री कशी करता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल , समीर शेख व आरसेटी संस्थेचे संचालक चेतन वैद्य होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी आत्मसमर्पण कक्षाचे प्रभारी अधिकारी पोउपनि गंगाधर ढगे, सहकारी भय्याजी कुळसंगे , मधूकर रत्नम आदींनी अथक परीश्रम घेतले.