अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील झटाळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा निलेश मसराम यांनी माहे नोव्हेंबर 2022 ते मे 2023 पर्यंत नियमानुसार मासीक सभा न घेतल्याने सरपंच रेखा निलेश मसराम यांना यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयाने सरपंच पदावरुन अपात्र केले आहे. याचीकाकर्ता उपसरपंच रविंद्र मसराम यांची बाजू ॲड. परमेश्वर अडकीने यांनी मांडली.
सन 2020-21 मध्ये झटाळा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक आयोजित करण्यात आली होती. त्यात सरपंच पदी रेखा निलेश मसराम यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदी रविंद्र शामराव मसराम यांची निवड करण्यात आली. मात्र, झटाळा ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा निलेश मसराम यांनी माहे नोव्हेंबर 2022 ते मे 2023 या कालावधीत मासीक सभा घेतलेल्या नाही, असा अहवाल घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांनी 12 सप्टेंबर 2023 रोजी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयात सादर केला. तसेच झटाळा ग्रामपंचायतचे सचिव यांनी 13 सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयात अहवाल सादर केला. त्यामुळे झटाळा येथील उपसरपंच रविंद्र शामराव मसराम यांनी दाखल केलेला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 36 नुसार विवाद अर्ज मंजूर करण्यात आला. तसेच झटाळा ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा निलेश मसराम यास पुढील आदेशापर्यत अपात्र घोषित करण्यात आले.