बाळू वाघ
शहर प्रतिनिधी जामनेर
जामनेर शहरातील असलेल्या इंदीरा आवाज जामनेर पुरा भुसावळ रोड भिलाटी या भागात छुप्या मार्गाने गावठी दारू विक्री सुरू असल्याने अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत. यातून पुढील पिढी वाईटमार्गाला लागू नये यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी अवैध दारूबंदीबाबत जामनेर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे
भुसावळ रोड, भिलाटी , जामनेर पुरा भागात गावठी दारूचे किमान सात ते आठ धंदे असून सकाळी व सायंकाळी या भागात दारू विक्री केली जाते. या ठिकाणी याआधी अनेक दारूचे धंदे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत व गुन्हेही दाखल केले, मात्र तरीही काही ठिकाणी छुप्या मार्गाने अद्याप दारूची विक्री होत असल्याने या भागातील लोक दारूच्या आहारी जाऊन काहींचे मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा या व्यावसायिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करावी यासाठी महिला, ग्रामस्थ व तरुणांनी एकत्रित येऊन जामनेर पोलीस ठाण्यात निरीक्षकांकडे निवेदन दिले.
गावठी दारूभट्टी व विक्रीबाबत पोलीस यंत्रणा सतर्क आहे. यासंबंधी सतत कारवाई केली जाते. तरीही निवेदनानुसार जामनेर शहरात व परिसरात असा व्यवसाय सुरू असेल, तर त्वरित कारवाई केली जाईल अशी माहिती जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली.


