संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- केंद्र सरकारने सर्वत्र आधार कार्ड सक्तीचे केले आहे. व्यक्तीच्या ओळखीसाठी बोटांचे ठसे लिंक केले आहे. मात्र जेष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयामुळे बोटांच्या रेषा पुसट झाल्या आहे. त्यामुळे आधारकार्ड कितीही वेळा अद्ययावत केले तरी ज्येष्ठांच्या बोटांचे ठसे उमटत नाही. ही प्रक्रिया ज्येष्ठांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे थम पद्धत बंद करावी यासाठी साथी निराधार संघटनेचे महेश पवार आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याला निवेदन पाठविले. महाराष्ट्र सरकार ६५ वर्षांवरील व्यक्तींना निराधार पेन्शन देत. ही रक्कम जरी तोकडी असली तरी या गरीब वृध्दांना ती महत्त्वाची आहे. महिन्याला दीड हजार रुपये निराधार पेन्शन मिळते त्यातच त्यांना आपला संसार भागवावा लागतो. मात्र तेही पैसे त्यांना वेळेवर मिळत नाही.वाढत्या वयामुळे बोटांवरील रेषा या पुसट झालेल्या आहे. त्यामुळे कुठलेही बँकेचे व्यवहार करत असतांना त्यांचे थम लागत नाही. बोटांच्या रेषा जुळत नाही त्यामुळे त्यांना निराधार पेन्शन बँकेमध्ये दिल्या जात नाही. आज हा प्रश्न संपूर्ण भारतात आहे. बोटांचे ठसे जुळत नाहीत, डोळ्यांचे स्कॅनिंगही होत नाही. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या कामासाठी आधार दुरुस्ती केंद्रे, आधार नोंदणी शिबिरे, बँका-पोस्टांच्या कार्यालयात हे जेष्ठ नागरिक हेलपाटे मारत आहे. अशा शेकडो ज्येष्ठ नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या निवेदनावर त्वरित कारवाई होऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी साथी निराधार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश पवार, वलीखा पठाण, विठ्ठल शेंद्रे, सूर्यभान नखाते, कमरुनिसा, वच्छला पेटेवार, विष्णु शिंदे, सूर्यभान नखाते, सुलोचना शेंडे, अंजनाबाई रामटेके, वेणुबाई लोंढे, सय्यद जाफर यावेळी उपस्थित होते.


