संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
देशाला, समाजाला सावरायची मोठी जबाबदारी ज्येष्ठांवरच आहे. कारण, कार्यरत राहणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कुटुंब व्यवस्था कोलमडली, त्यामुळे समाज भरकटला, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ज्येष्ठांनी कंबर कसण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण मराठे यांनी तळेरे येथे केले.तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने आयोजित ‘गौरव श्रेष्ठत्वाचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन बाळकृष्ण मराठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष वामन ताम्हणकर, माजी जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, कणकवली तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, तळेरे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे संस्थापक सुरेश तळेकर, अध्यक्ष सुरेश पाटणकर, सचिव दिलीप पाटील, विजय सावंत, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, खारेपाटण ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अनंत पाटणकर, खजिनदार सुरेश गोडवे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मराठे म्हणाले की, पुन्हा एकदा ज्येष्ठांनी कार्यरत झाल्यास समाज सुदृढ, कुटुंबव्यवस्थेला दिशा मिळेल आणि समाजाची वाटचाल योग्य दिशेने होईल. समाजाची वाटचाल पाहता आपली कर्तव्ये अंतर्मुख होऊन तपासण्याची आवश्यकता वाटते. यावेळी मनोहर पालयेकर, बी. पी. साळीस्तेकर, दादा कुडतरकर, प्रभाकर ताम्हणकर, वामन ताम्हणकर यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी तळेरे पंचक्रोशीतील 80 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. बी. पी. साळीस्तेकर, रघुनाथ गुरव, रमाकांत वरूणकर, कृष्णा माळवदे, बळीराम बांदिवडेकर, जगन्नाथ तळेकर, अर्जुन तळेकर यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्कारमूर्ती बी. पी. साळीस्तेकर म्हणाले की, उर्वरित आयुष्य अधिकाधिक समृद्ध आणि आनंदी कसे होईल यासाठीच्या शुभेच्छा या सत्कारामुळे मिळाल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तळेरे, कासार्डे, ओझरम, दारुम, साळीस्ते, शिडवणे, खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप पाटील, सूत्रसंचालन व आभार सुरेश पाटणकर यांनी मानले.


