सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २ डिसेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात शासन आपल्या दारी म्हणत कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे मत जिल्ह्यातील जनतेतून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राजकीय पक्ष कंबर कसून तयारी करताना दिसत असताना महाराष्ट्रातील राजकारणात अनपेक्षित बदल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील तरूण हाताला काम धंदा नसल्याने वाईट मार्गाने जात आहेत. राज्यात खुन, दरोडे , महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे तसेच भ्रष्टाचार आणि सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली जात आहे या सर्व प्रकरणांची माहिती असतानाही महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार मात्र डोळे मिटून शांत बसलेले दिसत आहे. महाराष्ट्रातील तरूणांच्या हाताला काम धंदा देण्यापेक्षा आपल्या पक्षाचा मोठेपणा आणि अजेंडा मिरवणे महत्वाचे वाटत आहे. बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता जिल्ह्यातील तरुण सुशिक्षित बेरोजगारीच्या आगीत होरपळत असताना राज्यातील सत्ताधारी सरकारने गेल्या काही दिवसांपासून सामान्य जनतेच्या विकासासाठी शासन आपल्या दारी असा अजेंडा मिरवत शासनाच्या तिजोरीवर आणि सामान्य नागरिकांना कष्टातून शासनाला मिळालेल्या करातून मिळणाऱ्या पैशाची उधळपट्टी करत असल्याचे जिल्ह्यातील जनतेचे मत येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात शासन आपल्या दारी म्हणत कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. ज्या पैशातून जिल्ह्यातील अनेक गोरगरीब लोकांचे प्रश्न मार्गी लागतील तो पैसा सत्ताधारी राजकीय पक्षाचे मंत्री, संत्री, आमदार, नेते मोठ्या प्रमाणावर उधळत आहेत. परळी वैजनाथ शहरातील परळी अंबाजोगाई महामार्गालगत असणाऱ्या वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील ग्राउंडवर सुमारे ३ कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीचा मंडप उभारण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या शासकीय निमशासकीय कार्यालयात बसून सोडवता येतात मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शासन आपल्या दारी अजेंडा सत्ताधारी सरकार मिरवत आहे. सामान्य कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी सरकारकडे बजट नाही आणि अजेंडा मिरवण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त एका शहरात ३ कोटींपेक्षा जास्त रूपये खर्च करण्यासाठी बजट आहे. असे मत जिल्ह्याभरातील सामान्य नागरिकांचे येत आहे.