बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अडीच वाजता अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील साखर साठविण्यात आलेल्या गोदामात अचानक पाणी शिरून गोदामात साठविलेली अंदाजे पाचशे मेट्रीक टन साखर पाण्याखाली जाऊन अख्या गोदामात पाणी साचले. या घटनेमुळे जवळजवळ दोन कोटी रुपयाचे साखरेचे नुकसान झाल्याचे कारखाना प्रशासनाने कळविले आहे. गाळप काही दिवस थांबणार दरम्यान, कारखान्याचे गाळप पूर्ववत सुरु करण्यासाठी सुद्धा 24 तासलागले. या अवकाळी पावसाचा तडाखा उस तोडणीवर पडला असून प्रत्येक शेतात पाणी साचून उस तोडणी दहा ते पंधरा दिवसाच्या लांबणीवर पडली आहे. उसतोड कामगाराच्या झोपड्यात , घरात पाणी साचल्यामुळे कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. उसतोड थांबल्यामुळे कारखान्याचे गाळप काही दिवस थांबणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कारखाण्याचे दोन कोटी नुकसान झाले असून कारखाण्याने 23 हजार 960 मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून कारखाण्याच्या गोडाऊनमध्ये काही जुनी व या हंगामाची असलेली 500 मेट्रीक टन साखर भिजून गेली. त्यामुळे 2 कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याचे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी सांगीतले.


