पवन मनवर
तालुका प्रतिनिधी, यवतमाळ
यवतमाळ:जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा रूपया पेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यातील 78 शेतकऱ्यांना विमा कंपनीने पाच रूपयांपेक्षा कमी मदत दिल्याचा प्रकार समाेर आला आहे.पीकविमा सर्वेक्षणासाठी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे पैसे मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी आक्रमक झालेत.दिवाळीपूर्वी विमा कंपनीने 59 हजार शेतकऱ्यांना 41 कोटीची विमा रक्कम जाहीर केली. या मदत यादीतील 9 हजार 727 शेतकऱ्यांना एक हजार रुपयाची मदत देखील हातात पडली नाही. यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात तीन, पाच आणि दहा रुपयांची मदत गोळा झाल्याची बाब पुढे आली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे,पाचशे, हजार रुपयांची मदत जमा झाल्याचा प्रकार मदत यादीतून समोर आला आहे.दरम्यान विम्याच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गट यवतमाळ मध्ये आक्रमक झाल्याचे आज पाहयाला मिळाले. विमा मॅनेजरला शेतीच्या बांधावर नेत बेदम मारहाण करुन त्याच्या ताेंडाला काळ फासण्यात आल्याची माहिती समाेर येत आहे.दरम्यान या प्रकारानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना तसेच पदाधिका-यांनी यवतमाळ तालुक्यातील कारेगांव यावली शेत शिवारात विमा कंपनीच्या कर्मचा-यास मारहाण करु नये अशी विनंती केली. त्यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन, पाच आणि दहा रूपयांची मदत देत त्यांची थट्टा केल्याचा आराेप विमा कंपनीवर केला.शिवसेना ठाकरे गटाच्या किशोर इंगळे आणि संजय रंगे म्हणाले पीक विमा वाटपात यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. 7 लाख 85 हजार नुकसानग्रस्त शेतकरी विम्या पासून वंचित राहिले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 509 कोटींचा विमा भरला होता. विमा कंपनीला 3177 कोटी रूपये नुकसानभरपाई देणे गरजेचे असताना प्रत्यक्षात 41 कोटी दहा लाख 61 हजार 781 रूपये दिले. 59404 शेतकऱ्यांना 41 कोटी 10 लाख 781 रूपये विमा खात्यात जमा झालेत. 8 लाख 44 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता.