नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी, महागाव
अनेक सामाजिक संघटनांचा आंदोलनास पाठींबा, महागाव ग्रामीण रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने आमरण उपोषणाला आज सोमवार पासून सुरुवात झाली. या आंदोलनास अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून हे आंदोलन ऐतिहासिक राहिल असे संकेत आहेत.चार ते पाच वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सत्ताधारी आमदारास ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यासाठी वेळ मिळत नाही. खासगी औषधोपचार करण्याएवढी गोरगरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यामुळे आजारांनी आजवर अनेकांचे बळी घेतले. गरीबांच्या घरातील कमावती माणसे आजाराने दगावली. ग्रामीण रुग्णालयासारखी उपचाराची अद्ययावत व्यवस्था असती तर काही जीव वाचले असते. मतांचा जोगवा मागणाऱ्या सत्ताधारी मंडळीच्या संवेदनाच मेल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे कायम आहे. या प्रश्नावर जनतेच्या मनात आता प्रचंड संताप धुमसत असून या संतापाची धग आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतपेटीतून बाहेर येईल असे संकेत आहेत. ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरु करावे या मागणीसाठी महागाव तालुका पत्रकार महासंघाने आंदोलनाची भुमिका घेतली असून महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी आज सोमवारपासून महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. गोरगरीब जनतेच्या जीवनमरणाशी निगडित असलेले ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी महागाव तालुक्यातील गोरगरीब जनता प्रचंड संतापली आहे. सत्ताधारी आमदार, खासदार आणि पालकमंत्री या विषयावर तोंडात गुळण्या धरुन बसले आहेत. ग्रामीण रुग्णालयाची इमारत मागील चार ते पाच वर्षापासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. महागाव मुख्यालयी बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाची कुलुपबंद इमारत रुग्णांना वाकुल्या दाखवित आहे. साडेचार कोटीच्या वर रक्कम खर्च करून बांधलेल्या ग्रामीण रुग्णाल्याच्या इमारतीचा हा पांढरा हत्ती असाच किती काळ पोसायचा हा प्रश्न आहे. महागाव मुख्यालयाला तालुक्याचा दर्जा मिळून ४२ वर्ष उलटली आहेत,मात्र महागाव शहर व आजुबाच्या ३० खेडेगावांच्या आरोग्याचा बोजा कालबाह्य झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आहे. महागाव येथील ग्रामीण रुग्णालयाला हिरवी झेंडी मिळाली आणि साडेचार कोटीचा निधीही मंजूर झाला.२० जुलै २०१८ रोजी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. वर्षभरात सुसज्ज अशी टुमदार इमारत उभी राहिली मात्र अत्यंत तकलादू कारणांमुळे ग्रामीण रुग्णालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प थंड बस्त्यात पडला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामात काही सटरफटर त्रुट्या काढल्या होत्या. या त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय इमारतीचे हस्तांतरण करून घेणार नाही अशी त्यांची भूमिका होती. आरोग्य आणि बांधकाम विभागांच्या श्रेयवादात महागावच्या जनतेचे आरोग्य टांगणीला लागले आहे. महागाव तालुक्याला उमरखेड सत्ताकेंद्राने वाळीत टाकले आहे. येथील जनतेच्या सुखदुःखाशी राजकिय मंडळीला काहीच घेणे देणे राहिले नाही. महागाव तालुक्याच्या मतदानावर निवडुण यायचे आणि नंतर येथील जनतेला दैवाच्या भरोशावर सोडून द्यायचे असाच राजकिन तमाशा सुरु आहे. आमदार,खासदार व पालकमंत्र्यांच्या बसलेल्या कानठाळ्या उघडल्या पाहिजे यासाठी आता पत्रकार महासंघ रस्त्यावर उतरला आहे.महागाव येथील ग्रामीण रुग्णालय सुरु व्हावे यासाठी पत्रकारांनी सातत्याने वृत्त प्रकाशित करुन शासनाचे व लोकप्रतिनिधींचे या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार, खासदार आणि शासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न तसाच धूळखात पडला आहे. शासन आणी आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी पत्रकारांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश पाटील भोयर, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष मोहन पांढरे, सचिव अमोल राजवाडे, सहसचिव नरेंद्र नप्ते, सरचिटणिस शेख तस्लीम, कोषाध्यक्ष मंचक गोरे, शहराध्यक्ष संजय कोपरकर, उपशहराध्यक्ष पवन रावते यांच्यासह पत्रकार महासंघाचे सर्व ६० पत्रकार सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पत्रकारांनी एखाद्या सामाजिक प्रश्नावर आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज दुपारी ११ वाजता प्रभारी तहसीलदार गोदाजी राठोड यांना निवेदन देऊन पत्रकार बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली.
विविध सामाजिक संघटनांचा आंदोलनास पाठींबा महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या आंदोलनास अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. मराठा सेवा संघ, सकल मराठा संघटना, राष्ट्रीय बंजारा परिषद,महागाव तालुका सरपंच संघटना, संभाजी ब्रिगेड तालुका महागाव, किसान युवा क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पद्मश्री विखे पाटील कृषी परिषद, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया संघ, फुलसावंगी पत्रकार महासंघ इत्यादी संघटनांनी जाहिर पाठिंबा दर्शविला आहे.